कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nagarpanchayat Election Result 2025 : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. आज (दि.21) नगर पंचायत आणि नगर परिषदांचे निकाल हाती येणार आहे. 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ही मतमोजणी प्रक्रिया राज्यभर एकाच दिवशी राबवली जात आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर आता निकाल हाती येत असून सर्वच राजकीय पक्षांना विजयाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस पक्ष विजयश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “निकाल थोड्या वेळात येणार आणि मी असं म्हणणार नाही की काँग्रेस पार्टी नंबर एक वर राहील पण तुम्ही सगळे या निकालानंतर चकित व्हाल. काँग्रेसला या राज्यात क्रमांक दोन वर आपण सगळे पाहू शकाल. ग्रामीण भागातील जनता आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, मेट्रो शहराविषयी आम्ही फार बोलू शकत नाही,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर
पुढे ते म्हणाले की, “विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील, महाराष्ट्रात प्रचंड पैशाचा पूर आणला गेला सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सहकार्याने एक क्रमांकावर राहील. आम्ही जनतेच्या सहकार्याने कुठलेही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक दोन पर्यंत पोहोचेल याचाच अर्थ जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि राहील,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मात्र भाजप पक्ष हा राज्यामध्ये मोठा असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी मान्य केले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “राज्यामध्ये एक नंबर वर भाजपच राहील. मात्र हे नक्की निकाल आल्यानंतर समजेल. 246 नगरपरिषद आहेत 246 नगरपरिषदांमध्ये काँग्रेस राज्यात क्रमांक दोनवर राहील एवढा मी खात्रीने सांगतो,” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : ‘पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणे गुन्हा…’, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, “शिंदे शिवसेना तिसरा नंबर वर जाईल, सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण राज्यात आमचे 16 आमदार आहेत फक्त. सोळा आमदाराच्या बळावर आम्ही क्रमांक दोन वर पोहोचतो आहे म्हणजे जनतेच्या मनातील महिलांच्या बेरोजगारांच्या तरुणांच्या मनातील तो उद्रेक असा त्याचा अर्थ निघेल आणि त्यापासून सत्ताधारी धडा घेतील अशी मी आगाऊ सूचना देतो. विदर्भात चांगला परफॉर्मन्स करू आणि विदर्भात किमान 30 ते 32 नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात तुम्हाला दिसते. ऍक्टिव्ह मोड वगैरे काही नसतं, सत्ता पावर त्यांच्याकडे त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात,” असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.






