आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी तुटली; काँग्रेस स्वबळावर (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी ही घोषणा केली. मुंबई काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर चेन्नीथला म्हणाले, ‘आम्ही महाविकास आघाडीसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की, नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात. त्यामुळे काँग्रेस बीएमसी निवडणुका स्वबळावर लढणार आहे’.
गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. राज्य सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. कारण त्यांना महानगरपालिकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवायचे होते. परिणामी, बीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महायुती लोकांच्या समस्यांकडे लक्ष न देता हिंदू-मुस्लिम संघर्ष भडकवून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपाचा अजेंडा आहे. काँग्रेस संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाईल, असे चेन्निथला यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election 2025 : निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लागले लक्ष
तसेच महापालिका निवडणुकीसाठी लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. जर काँग्रेस बीएमसीमध्ये सत्तेत आली तर मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईतील लोकांना संघर्ष नको तर विकास हवा आहे. आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाऊ, असेही म्हटले आहे.
युतीतील मतभेदही उघड
एकीकडे राज्यात आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत असताना, युतीमध्ये देखील सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईत भाजपकडून गरजेनुसार युतीची घोषणा केली गेली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात देखील भाजपाने काहीसे नमते घेत ठाणे जिल्ह्यात देखील युतीसाठी बैठकांना सुरुवात झाली आहे. मात्र, नवी मुंबईत गणेश नाईक मात्र स्वबळावर लढण्यासाठी ठाम असून, माजी खा. संजीव नाईक यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्वबळाचा पुनरुच्चार केल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेकडून युतीचा पुनरुच्चार केला जात असला तरी मिळालेल्या माहितीनुसार खुद्द एकनाथ शिंदे देखील स्वबळाचा प्रयोग करण्याची शक्यता वाढली आहे.






