नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. मनपा प्रशासनाने या निवडणुकीसाठी आवश्यक ती सज्जता केली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी बुधवार दि. १७ रोजी पत्रकार परिषदेत दिली.
१५ डिसेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली असून शहरातील सर्व राजकीय बॅनर काढण्यात आले आहेत. राजकीय पक्षांचे चिन्ह, प्रतिके तसेच कमानी झाकण्याचे काम मनपा प्रशासनाने मागील दोन दिवसात केले आहे. मनपा प्रशासनाने सुक्ष्मरित्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली होती, याची माहिती आयुक्त डोईफोडे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. नांदेड शहराची लोकसंख्या ५ लाख ५० हजार ४३९ इतकी असून मतदारसंख्या ५ लाख १ हजार ७१९ इतकी आहे. शहरात चार सदस्यीय १९ प्रभाग असून पाच सदस्यीय एक प्रभाग आहे.
हे देखील वाचा : नशामुक्त नांदेडसाठी उचलले कठोर पाऊल; अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई
२० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडून द्यायचे असून ४० पुरूष व ४१ महिला नगरसेवक निवडले जाणार आहेत. शहरात ६०० मतदान केंद्र असून २० प्रभागांसाठी ७निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्यासमवेत २१ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, यात तहसीलदार, मनपाचे क्षेत्रिय अधिकारी, उपअभियंता यांचा समावेश आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे, निवडणूकीसाठी ४ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : शिवसेना इन राष्ट्रवादी आऊट; मुंबईसाठी भाजपचा मास्टरस्ट्रॉक, कोण होणार महापौर?
तंत्रनिकतेन महाविद्यालयात मतमोजणी
आचारसंहिता पथकासह विविध पथके स्थापन करण्यात आले आहेत. शहरातील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र येत्या २० तारखेस निश्चीत केले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंध संधू यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
३१ रोजी उमेदवारी अर्जाची छानणी होणार असून २ जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप केले जाणार असून १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दि. १६ जानेवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.






