शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताईनगरमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवारांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करत महाराष्ट्रातील भाजपच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या विधिमंडळातील कामाचा उल्लेख करत त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचं कौतुक केलं. अनेक वर्षे खडसेंनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि मतदारसंघाने त्यांना सातत्याने विधानसभेत पाठवलं, असं पवारांनी सांगितलं.
‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
महाराष्ट्रातील भाजपच्या सुरुवातीच्या काळाचा उल्लेख करत पवार म्हणाले की, पक्ष उभा करण्यामध्ये एकनाथ खडसे आणि प्रमोद महाजन यांची भूमिका महत्त्वाची होती. मंत्रिमंडळात असताना खडसेंनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आणि राज्याच्या विविध भागांत संघटनात्मक काम केलं, असंही त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीदेखील खडसेंच्या राजकीय प्रवासाचं कौतुक केलं. विरोधी पक्षात असताना सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरण्याची त्यांची पद्धत प्रभावी होती. विधिमंडळात मुद्दे मांडताना त्यांचा आवाज आणि आक्रमक शैली यामुळे त्यांचं वेगळं स्थान निर्माण झालं, असं पाटील म्हणाले.
खडसेंनी शेतकरी आणि सिंचनाच्या प्रश्नांवर काम केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक जलसिंचन प्रकल्पांना चालना मिळाल्याचं पाटील यांनी सांगितलं.
अमृत महोत्सवी सोहळ्यात एकनाथ खडसेंनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. छोट्या गावातून राजकारणाला सुरुवात करून ग्रामपंचायत, सरपंचपद, पंचायत समिती आणि त्यानंतर विधानसभेपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला.
1990 मध्ये विधानसभेत प्रवेश मिळवताना प्रमोद महाजन यांनी आपल्याला मोठी ताकद दिल्याचं खडसेंनी नमूद केलं. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबतच्या जुन्या राजकीय काळाची आठवण काढताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.
खडसेंनी आपल्या भाषणात मुक्ताईनगर आणि परिसरातील विकासकामांचा उल्लेख केला. तापी नदीवरील प्रकल्पांमुळे या भागातील शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सांगताना त्यांनी एका विद्यमान नेत्याचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?
राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, वैयक्तिक दुःखाचे प्रसंगही आले; मात्र कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण पुन्हा उभे राहिलो, असं खडसेंनी सांगितलं. शरद पवारांनी कठीण काळात दिलेल्या साथीसाठी त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
एकीकडे भाजपपासून दूर गेलेले खडसे आणि दुसरीकडे भाजपच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचा शरद पवारांनी केलेला उल्लेख, यामुळे मुक्ताईनगरमधील हा सोहळा आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनेही चर्चेचा ठरला आहे.






