मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाबाबत खसादार नारायण राणे यांचा मोठा खुलासा (फोटो - सोशल मीडिया)
रत्नागिरी : मागील दोन वर्षापासून राज्यामध्य मराठा आरक्षणावरुन रान पेटले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन करुन अनेकदा आमरण उपोषण केले आहे. यापूर्वी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र एका नेत्याने मराठा आरक्षणासंदर्भात प्रस्ताव मांडण्यास नकार देत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये खासदार नारायण राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. तसेच मराठा आरक्षणावर देखील भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले की, मराठा समाजाने आपण कुठे उभे आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाची लोकसंख्या 30 टक्के आहे. परंतु आयएएस, आयपीएसमध्ये 15 टक्के युवक आहेत. दारिद्ररेषेखाली मराठा समाजाची लोकसंख्या 22 टक्के आहे. शेतीपासून राजकारणात आपला समाज कुठे आहे. या सर्व बाबींचा विचार करायला हवा, असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी महासंमेलनामध्ये बोलताना खासदार नारायण राणे यांनी मराठा आरक्षण संदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडण्याचा किस्सा सांगितला. यावेळी नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती नेमली. त्याचे अध्यक्ष मला केले. मराठ्यांना आरक्षण देणार ही माझी अध्यक्ष म्हणून भूमिका होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मला फोन आला. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये, असे भुजबळ साहेबांनी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भुजबळ यांना मी फोन केला आणि विनंती केली अन् सांगितले, आम्ही कुठल्याही समाजाचे आरक्षण घेत नाही, असा गौप्यस्फोट खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, घटनेच्या १४ (४) आणि १५ (४) प्रमाणे नियमानुसार मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळावे. १६ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. भुजबळ यांनी समजवले. त्यानंतर प्रस्ताव आला. त्यावेळी बैठकीत कोणी या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. परंतु मी विषय रेटून नेला आणि संमत केला, असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
जरांगे पाटील यांना भुजबळांचे सडेतोड उत्तर
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना सडेतोड उत्तर दिले होते. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सर्व मराठा समाज हा कुणबी असून मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्याची मागणी केली आहे. मात्र मराठा आरक्षण हे पूर्णपणे वेगळे देण्यात यावे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.