
MLA Sunil Shelke emotional reaction on death DCM Ajit Pawar marathi news
Ajit Pawar Passed Away : वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले आहे. सकाळी 8.45च्या सुमारास अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र अवघ्या काही वेळात महाराष्ट्राचे दादा अजित पवार गेल्याची बातमी समोर आली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय क्षेत्र हळहळले आहे. या शोक प्रसंगावर प्रतिक्रिया देताना मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार सुनील शेळके यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले की, “बातमी कळताच मनात अक्षरशः धस्स झाले. काही क्षणांतच सर्वकाही बदलल्यासारखे वाटले. हे खरं आहे असं मान्य करायला मन तयार होत नव्हतं,” असे आमदार शेळके म्हणाले. मावळच्या विकासासाठी अजित पवार यांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
“मावळचा विकास हा दादांच्या मनात कायम होता. मी जे जे मागितले, त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी दिले. माझ्या प्रत्येक हट्टाला त्यांनी प्रेमाने साथ दिली,” असे सांगताना आमदार शेळके भावूक झाले. दादा आणि माझे संबंध गेल्या सहा–सात वर्षांपासून अतिशय जिव्हाळ्याचे होते. जाहीर सभांमधील त्यांचे आश्वासक शब्द, आमदार म्हणून माझे लाड पुरवताना केलेल्या मिश्किल टिप्पणी आणि मावळच्या जनतेवर असलेले त्यांचे खास प्रेम हे सर्व त्यांनी कृतीतून दाखवून दिले, असेही त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, “दुःखाला परिसीमा नसते, हे आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. त्या क्षणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता,” असे सांगत आमदार शेळके यांनी पवार कुटुंबीयांप्रती व अजित पवार यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. घटनेनंतर मावळ तालुक्यासह राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संपर्क साधत माहितीची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी संपूर्ण राजकीय वातावरणात शांतता आणि चिंता जाणवत होती.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी
मावळ तालुक्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे असून, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अनेक कामांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळाली असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी नमूद केले. “मावळचा विकास हा दादांचा जिव्हाळ्याचा विषय होता,” असे ते म्हणाले.
“दादा आणि मावळ यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते भावनिक होते. मावळच्या जनतेसाठी काहीही कमी पडू नये, यासाठी ते कायम आग्रही असायचे,” असे सांगत आमदार शेळके यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगामुळे राजकारणातील अनिश्चितता आणि क्षणभंगुरता पुन्हा एकदा समोर आली असून, जनतेमध्येही भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून चिंता व्यक्त करत देवाकडे प्रार्थना केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, परिस्थिती स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, त्या काही क्षणांच्या बातमीने निर्माण झालेला धक्का आणि भावनिक आंदोलन दीर्घकाळ लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया मावळ परिसरातून व्यक्त होत आहे.