मनसे राज ठाकरेंची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट करुन आठवणींना उजाळा दिला (फोटो - सोशल मीडिया)
Ajit Pawar Passed Away : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. लॅंडिग दरम्यान विमानाचा अपघात झाल्यामुळे अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. राज ठाकरे यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळ दिला.
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान असल्याची भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी लिहिले आहे की, “माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली,” असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.
हे देखील वाचा : प्रोटोकॉल बाजूला, माणुसकी पुढे! अजित पवारांनी २० दिवसांपूर्वी नक्की काय केलं होतं? वाचा तो थरारक प्रसंग
“१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील, अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केल्या
पुढे त्यांनी लिहिले की, प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.”
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी… pic.twitter.com/yIjUC255Af — Raj Thackeray (@RajThackeray) January 28, 2026
“अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.”
हे देखील वाचा : कल्पक आणि एकमेव निर्भीड राजकीय…’दादामाणूस’ गेल्याची भावना; अमित देशमुख यांनी व्यक्त केला शोक
“राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.






