अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Ajit Pawar Plane Crash News In Marathi : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. बुधवारी सकाळी ही बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि इतर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पुण्यातील बारामती परिसरात अजित पवार यांचे विमान लँडींग होत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांच्या अचानक निधनाने त्यांच्या शब्दांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचे एक स्वप्न होते, जे अपूर्ण राहिले. याचदरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा राज्यभरात दुखवटा जाहीर केला.
“संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.” हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्याचे जावई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मित्रचे उपाध्यक्ष भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ते आतेमामा होत. त्यांच्या निधनाने व्यथित झालेल्या राणा पाटलांनी आपल्या समाजमाध्यमावर स्क्रीन काळी करून दुःख व्यक्त केले आहे. अर्चना पाटील आणि मल्हार पाटील यांनीही स्क्रीन काळी करून दुःख व्यक्त केले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी, ‘निशब्द: दादा.. माझे आतेमामा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.. मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी.. आशा भावना व्यक्त केल्या आहेत. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत.
५ डिसेंबर २०२४ रोजी अजित पवार त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ही भूमिका बजावली आहे. त्यांनी पहिल्यांदा २०१० मध्ये हे पद स्वीकारले. ते आठ वेळा बारामतीचे आमदार राहिले आहेत. २०१० मध्ये चव्हाण यांच्यानंतर ते २०१२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये फडणवीस यांच्या अल्पायुषी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले. २०२२ मध्ये ते भाजप आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले.






