राहुल गांधींच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींची मिमिक्री केल्याने फडणवीसांनी साधला निशाणा
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमातील नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कार्यक्रमात एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री केली. यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.
नागपुरातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत टीका केली. “मला असं वाटत आहे की, त्यांना आता हेच काम उरलं आहे. त्यांनी आता पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियनचं काम करावं. त्यांनी ते केल्यास त्यांना चांगला रोजगार मिळेल,” असं फडणवीस म्हणाले. याचवेळी फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. “इथे तर त्यांच्या पक्षाला बेरोजगार करून ठेवलं आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, नागपुरातील कार्यक्रमात फडणवीस यांनी सोलर मॉड्युल निर्मितीच्या कारखान्याचीही माहिती दिली. या कारखान्यात अत्याधुनिक पद्धतीने सोलर मॉड्युल तयार होत असून, सोलर क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2024 मध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर कारखान्यात सुमारे 5 हजार कामगार काम करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. बदलत्या महाराष्ट्रासह विदर्भ आणि नागपूरच्या औद्योगिक इकोसिस्टमचं हे उदाहरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
बुटीबोरीमध्ये सध्या अतिरिक्त जागेची मागणी वाढली असल्याचं सांगताना फडणवीसांनी नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या हालचालींची माहिती दिली. महिंद्राला सुमारे एक हजार एकर जागा देण्यात आली असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत तिथे काम सुरू करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच सावनेरमध्ये सुमारे 5 हजार एकर जागा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.
मात्र, या सर्व मुद्द्यांमध्ये राहुल गांधींवरील फडणवीसांची टीका चर्चेचा विषय ठरली आहे. मोदींच्या मिमिक्रीवरून सुरू झालेला हा वाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही पोहोचला आहे.






