खासदार संजय राऊत यांनी महाड प्रकरणावरुन महायुती सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut Live : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र अद्याप जागावाटप आणि उमेदवार समोर आलेले नाहीत. मात्र महाड नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झडापट झाली. यामध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. हे प्रकरण चंगलंच तापलं आहे. विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र डागले.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच महायुतीवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ठार मारण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला केला आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टाने गागोवले यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्री, मंत्र्यांची मुलं, त्यांचे भाऊ यांनी खून केले, दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री फडणवीस आणि राज्याच्या महासंचालकांनी अभय दिलं आहे का ? तो (गोगावले) फरार आहे, आणि पोलिसांना सापडत नाही, त्याचा अटकपूर्वी जामीन फेटाळला जातो,तरीही तो सापडत नाही,” असे टीकास्त्र संजय राऊतांनी डागले.
हे देखील वाचा : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री
पुढे ते म्हणाले की, “राज्याचा एक मंत्री (कोकाटे) बेपत्ता होतो आणि 48 तास सापडत नाही. पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. कुठे गेला मंत्र्यांचा (गोगावले) मुलगा ? कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात,” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. त्यामुळे महाड प्रकरणावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढणार? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
महायुतीमध्ये महापालिका निवडणुकीवरुन अंतर्गत वाद सुरु आहे. राष्ट्रवादीने स्बळाचा नारा देत भाजप विरोधात उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. यावरुन राऊत यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. भाजपसोबत असलेल्या आघाडीतील लोकं हे भाजपचा पराभव करण्यास इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष हे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं. ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजप चालवतंय ते पाहिलं आहे का, गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे,” असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.






