फोटो सौजन्य - Social Media
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या नियमांनुसार उमेदवारांना अर्ज प्रक्रियेदरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. हा फोटो प्रत्यक्ष वेळेत (Live Capture) घेतला जाणार असल्याने, अर्ज भरणारी व्यक्ती खरीच उमेदवार आहे की नाही, याची तात्काळ खातरजमा करता येणार आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेला उमेदवार आणि अर्जात दिलेला फोटो यांची फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे तुलना केली जाणार आहे.
हा महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षांमधील वाढती फसवणूक, बनावट प्रवेशपत्रे, दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा देण्याचे प्रकार आणि तांत्रिक गैरप्रकार लक्षात घेता अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याची गरज समितीने अधोरेखित केली होती. या निर्णयामागे नीट-२०२५ दरम्यान राबविण्यात आलेला एक प्रायोगिक उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. दिल्लीतील काही निवडक परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित फेसियल रिकग्निशन ऑथेंटिकेशन प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती. या प्रायोगिक प्रकल्पात उमेदवारांची ओळख पडताळणी यशस्वीरीत्या पार पडली असून, गैरप्रकारांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
हा प्रयोग भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर (NIC) आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आला. तिन्ही संस्थांनी मिळून विकसित केलेली ही प्रणाली सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. एनटीएने पुढे सांगितले की, २०२६ पासून देशभरातील प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये ही फेस रिकग्निशन प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला नीट आणि जेईईसारख्या मोठ्या परीक्षांमध्ये अंमलबजावणी करून नंतर इतर परीक्षांमध्येही ही व्यवस्था राबवली जाणार आहे.
या निर्णयामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, परीक्षांबाबत निर्माण झालेली शंका आणि अविश्वास दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत योग्य काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षाही काही पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शिस्त आणण्यासाठी एनटीएचा हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील परीक्षा प्रक्रियेसाठी तो दिशादर्शक ठरणार आहे.






