खासदार संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut : मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याची अनेक नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपली असून त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल, अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केले असून हे प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयानक असल्याची टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये आणखी अनेक नेत्यांची नावे येण्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच अशोक खरात प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. खासदार राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात आता कोण लपून राहिलं आहे? “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले आहेत. त्या खरातच्या हमाममध्ये कोणा-कोणाची नावं घेणार आहात? असे खासदार राऊत म्हणाले आहे.
पुढे राऊत म्हणाले की, “अशोक खरातने जी नावं घेतली आहेत, त्यांच्याकडे कोण-कोण येत होतं, हे पोलीस किंवा एसआयटीने जाहीर करावं. महिला व बालकल्याण मंत्र्यांनी बोललं पाहिजे. त्यांच्या वडिलांचा त्यांच्याशी संबंध होता किंवा त्या स्वतःही भक्त आहेत. विशेषतः महिलांवर अत्याचार झालेले आहेत, त्यांचं शोषण झालेलं आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण मंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याबाबत व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : शिवसेनेची विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी
“महाराष्ट्रातील हे एक मोठ प्रकरण आहे. यावर देशाच्या राष्ट्रपतींनी बोललं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढं मोठं प्रकरण घडलं आहे.देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आहे. काल त्या मथुरेला गेल्या होत्या आणि प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी राष्ट्रपतींना धर्मात्मा म्हटलं.जर त्या धर्मात्मा असतील, सज्जन महिला असतील, तर महाराष्ट्रात महिलांचं मोठ्या प्रमाणात शोषण झालं आहे, आणि सरकार माहिती दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश द्यावेत आणि राज्यपालांनी हस्तक्षेप करावा,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या
एपस्टीन प्रमाणे अशोक खरातला देखील तुरुंगात मारतील असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “विजय वडेट्टीवार म्हणत आहेत, म्हणजे काहीतरी तथ्य असेल.एपस्टीनला तुरुंगात मारण्यात आलं, हे खरं आहे. त्यामध्ये जगभरातील नेत्यांची नावं होती.खरात प्रकरणातही अनेक राजकारणी, उद्योगपती, आयएएस, आयपीएस अधिकारी अडकलेले असू शकतात. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून तपास योग्य दिशेने नेला आणि त्या बाबाला पूर्णपणे उघड केलं. त्यामुळे तुरुंगातही त्याची विशेष काळजी घेतली जाईल. त्याच्यावर हल्ला होणं किंवा त्याला मारणं सरकारला परवडणार नाही. वडेट्टीवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत,” असे देखील खासदार राऊत म्हणाले आहेत.






