महायुतीत रामदास आठवले आक्रमक! ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’; मित्रपक्षांकडे केली मोठी मागणी
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “मला केंद्रात मंत्रिपद मिळाले ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्री केले, त्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही महाराष्ट्रात सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आम्हाला सोबत नक्कीच मिळाली होती, परंतु सध्याच्या काळात मित्रपक्ष म्हणून आम्हाला गृहीत धरलं जात आहे. भाजप आणि शिवसेनेसोबत असूनही पक्षाला एकही मंत्रिपद महाराष्ट्रात मिळालेले नाही.
विधानपरिषदेवर एक जागा: राज्यपाल नियुक्त ५ रिक्त जागांपैकी १ आमदारकी आरपीआयला मिळावी.
दोन महामंडळांचे अध्यक्षपद: आरपीआयला किमान दोन राज्यस्तरीय महामंडळांचे अध्यक्षपद आणि कार्यकर्त्यांसाठी ४० ते ५० सदस्यपदे मिळावीत.
स्थानिक समित्यांमध्ये वाटा: प्रत्येक जिल्ह्यात डीपीडीसी (DPDC) समित्या, तालुका समित्या आणि ‘एसओ’मध्ये कार्यकर्त्यांना संधी द्यावी. यासाठी पालकमंत्र्यांना स्पष्ट आदेश दिले जावेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना आठवले म्हणाले, आम्ही केवळ भाजपच्या कोट्यात आहोत असे समजणे चुकीचे आहे. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा घटक पक्ष आहे.” २०१२ मधील बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीला उजाळा देत आठवले म्हणाले, “शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रात मोठे सामाजिक परिवर्तन घडेल, असा विश्वास बाळासाहेबांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आमचा सन्मान झालाच पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, चार-चार वॉर्डांच्या प्रभाग पद्धतीमुळे छोट्या पक्षांचे मोठे नुकसान होत असून कार्यकर्त्यांना स्वतःच्या बळावर निवडून येणे कठीण जात आहे. “मोठ्या पक्षांसाठी ही पद्धत ठीक असेल, पण छोट्या पक्षांचा विचार करून पूर्वीसारखी ‘एकल वॉर्ड पद्धती’ पुन्हा लागू करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पक्षाची शाखा पसरली असून नागालँड आणि मणिपूरमध्ये आरपीआय मान्यताप्राप्त पक्ष आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून आरपीआयला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या महायुतीत जागावाटप आणि सत्तेच्या वाटपावरून चर्चा रंगलेली असतानाच, रामदास आठवले यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील प्रमुख पक्षांवर आरपीआयला सत्तेत वाटा देण्यासाठी मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे.






