File Photo : Sharad Pawar
सांगली : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुक होणार असून यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. लोकसभा निवडणूकीनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडला गेला. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही युती उमेदवारांची चाचपणी आणि जागावाटपची तयारी सुरु आहे. दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर महायुतीचे अनेक नेते खरपूस टीका करत असतात. आता राजकीय वर्तुळातील आणखी एका नेत्याने शरद पवार यांना अलिबाबा तर त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना चाळीस चोर म्हटले आहे.
विधानसभेमुळे राजकारण रंगले आहे. यामध्ये आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी अलिबाबा म्हणून टीकास्त्र डागलं आहे. जतमध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत सामील झाले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे हे पवारांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध आहे. फडणवीस एकच गोळी देताय आणि सगळा रोग बरा करताय हे पवारांच्या लक्षात आले आहे. म्हणून सकाळ-संध्याकाळ उठले की सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बोलतात, असा टोला सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला लगावला.
हे देखील वाचा : हरयाणाचा मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ प्रमुख नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु
ते पुढे म्हणाले की, ‘शरद पवार हे अलिबाबा आणि पवारांच्या भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत. एकप्रकारे पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना देवेंद्र फडणवीस नावाचा भस्म्या रोगच झाला आहे. या लोकांना देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरं काही दिसत नाही, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. मात्र ही टीका करण्याची सदाभाऊ खोत यांची पहिली वेळ नाही. या आधी देखील सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. मुस्लीम समाजाने शरद पवार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन केल्यामुळे खोत यांनी टीका केली होती. आपला सासरा आता आलेला आहे. त्यामुळे जावयांनी तिथे आरोळी दिली की, अहमदनगरचे नाव अहमदनगरच ठेवा, अशी गंभीर टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.