आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना 'या' महत्वाच्या सूचना
निळवंडे कालव्यांना सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचला तातडीने पाणी सोडून लाभक्षेत्रातील सर्व गावांतील ओढे, बंधारे, साठवण तलाव आणि गावतळे पूर्ण क्षमतेने भरावेत, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांना दिल्या आहेत.
कोपरगाव मतदारसंघातील रांजणगाव देशमुख आणि परिसरातील जिरायती गावांमध्ये आमदार काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तळेगाव ब्रांचमार्गे निळवंडेचे पाणी नियमित सोडले जात आहे. त्यामुळे पूर्वी टँकरवर अवलंबून राहणाऱ्या या गावांमध्ये भर उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नव्हती. मात्र, सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवर्तन सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
निळवंडे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे तळेगाव ब्रांचमार्गे सर्व लाभधारक गावांतील ओढे, गावतळे, पाझर तलाव आणि साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यास पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल. तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल.
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
उन्हाची तीव्रता वाढत असताना जलसाठे पूर्ण भरल्यास नागरिकांसोबतच जनावरांच्या पाण्याची आणि चाऱ्याची समस्या देखील कमी होईल. तसेच भूजल पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी चारा पिकांसाठी काही प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नागरिकांकडून आवर्तनाची मागणी होताच आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. लाभक्षेत्रातील सर्व साठवण तलाव, गावतळे आणि बंधारे काळजीपूर्वक व पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे निर्देश आमदार काळे यांनी प्रशासनाला दिले आहेत.






