सह्याद्री सहकारी साखर निवडणूक 2025 सत्ताधाऱ्यांची विजयाकडे वाटचाल झाली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल चार हजारांची आघाडी घेतली. यामध्ये विरोधी आमदार मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे पॅनल दुसऱ्या, तर निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर असल्याने पी. डी. पाटील पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सुमारे 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सरासरी 4000 मतांची आघाडी घेतल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.
सायंकाळी 5.30 वाजण्याचा सुमारास दुसऱ्या फेरीतील मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार होता. दरम्यान, अंतिम निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता होती. एकंदरीत पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलच्या उमेदवारांची सरासरी 4000 हजारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सर्व 99 मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु, या निवडणुकीत कमालीची टशन दिसून आल्याने मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.