
एकेकाळी होते ममतांचे 'उजवा हात', मग सुवेंदू अधिकारींच्या हाती कसे आले 'कमळ'? (Photo Credit- AI)
Historic Moment – HM Amit Shah announces that Suvendu Adhikari is next CM of Bengal. pic.twitter.com/onTKQL6sZz — News Arena India (@NewsArenaIndia) May 8, 2026
एकेकाळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सुवेंदू अधिकारी आता बंगालच्या सत्तेच्या शिखरावर पोहोचले आहेत. या निवडणुकीत त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करून भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, ममता दीदींचे खंदे समर्थक असलेले सुवेंदू अधिकारी कट्टर विरोधक कसे बनले? यामागील राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे.
सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादाची ठिणगी नोव्हेंबर २०२० मध्ये पडली होती. २६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी ‘हुगळी रिव्हर ब्रिज कमिशन’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पाठोपाठ २७ नोव्हेंबर रोजी त्यांनी राज्याच्या परिवहन मंत्रिपदाचाही त्याग केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातील वाढत्या अंतर्गत कलहामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. १६ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि १७ डिसेंबर रोजी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला. अखेर १९ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुवेंदू अधिकारी यांच्या बंडामागे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे वाढते वर्चस्व हे मुख्य कारण होते. अभिषेक बॅनर्जी यांना ममतांचे राजकीय वारसदार म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याने अधिकारी नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी दीदींची साथ सोडली. २०२१ च्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना १९५६ मतांनी पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली होती.
पश्चिम बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत असून सुवेंदू अधिकारी हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री ठरणार आहेत. विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी जनतेचे आभार मानले असून, “बंगालमध्ये आता विकासाचे नवे पर्व सुरू होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Next CM of Kerala: केरळमध्ये काँग्रेसचा ‘सस्पेन्स’ कायम; ‘या’ तीन नेत्यांची नावं चर्चेत