पाटणमध्ये राजकीय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, (फोटो - टीम नवराष्ट्र)
पाटण : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधक यांच्यामधील वाद जोरदार रंगले आहे. पाटणमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे पाटणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटण तालुक्यात झालेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला शह देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडूनही प्रतिमोर्चा काढण्यात आला.
विधानसभा निवडणूकीमुळे पक्षांमधील वादविवाद वाढले आहे. पाटणमध्ये एकमेकांना शह देण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या काळात कोट्यवधी रुपयांची निकृष्ठ दर्जाची विकासकामे झाल्याचा आरोप करून याची पोलखोल करण्यासाठी पुराव्यासह माहिती शासनाला देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी उबाठा गटाचे शिवसैनिक मोर्चाला उपस्थित राहत असताना पोलिसांवर दबावतंत्र वापरून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याने केल्याचा आरोप करत हर्षद कदम व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दिवसभर पाटण शहरात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शुक्रवारी (दि.27) पाटण शहरात हे दोन्ही मोर्चे नवीन बसस्थानक परिसरात समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पन्नास खोके एकदम ओके…अशा घोषणा उबाठा गटाने दिल्या तर शंभूराज देसाई जिंदाबादच्या घोषणा शिंदे गटाकडून देण्यात आल्या. याच दरम्यान प्रचंड तणाव लक्षात घेता पोलिसांनी कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवून पोलीस वाहनांच्या सहाय्याने हे दोन्ही मोर्चे रोखण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील कार्यकर्त्यांनी याला छेद देत रस्त्यावर आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गट आमने-सामने भिडल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. देसाई समर्थकांचा मोर्चा काही काळानंतर शांत झाला. मात्र पोलिसांनी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याने व झेंडे काढून घेतल्याने झेंडा चौकात उबठा गट व पोलिसांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. झेंडा चौकातच उबठा गटाकडून ठाण मांडण्यात आले. झेंडा चौक येथे उबाठा गटाच्यावतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या व जाणीवपूर्वक षडयंत्र रचून हा मोर्चा अयशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्र्यांनीच हा प्रकार केल्याचा आरोप करून सार्वत्रिक निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यानंतर उबाठा गटाचा मोर्चा लायब्ररी चौक येथे नेण्यात आला. त्या ठिकाणी हर्षद कदम म्हणाले, “पाटण तालुक्याने यापूर्वी माजी मुख्यमंत्र पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा कार्यकाल पाहिला आहे. मात्र दुर्दैवाने आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांची दडपशाही, हुकूमशाही तालुक्यात अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्य जनताच नव्हे तर अगदी प्रशासनही या हुकूमशाहीला कंटाळले आहे. त्यांच्या काळात झालेल्या गैरकामांची आम्ही पुराव्यासह माहिती शासनाकडे देणार होतो व यातील दोषींवर कारवाई करा, अशी आमची मागणी आहे. जर हे आरोप खोटे ठरले तर आम्ही देखील द्याल त्या शिक्षेला पात्र राहू. अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही हा या मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र दुर्दैवाने या दडपशाही वृत्तीने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पालकमंत्र्यांनी हा मोर्चा, जनभावना व लोकशाही चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या विधानसभेत वाट्टेल त्या परिस्थितीत पालकमंत्र्यांना स्थानिक जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. पालकमंत्र्यांच्या प्रतिमोर्चामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते नव्हते तर केवळ टक्केवारी, ठेकेदारीतून मोठे झालेले ठेकेदार तथा मलिदा गॅंग होती. पाटण मतदारसंघाचे नेतृत्व आता ही मलिदा गॅंग करत असल्याने हा मतदारसंघ ठेकेदार व मलिदा गॅंगच्या हातात गेल्याने येथील लोकशाही संपुष्टात आली आहे,” अशी गंभीर टीका हर्षद कदम यांनी केली.
मोर्चाला पाटण मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शहरातील ही तणावापूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कुडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व राज्य राखीव पोलीस यंत्रणा, कराड, मल्हारपेठ, कोयना, ढेबेवाडी येथील पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सक्रिय होती. दोन्ही गटाच्या मोर्चामुळे झेंडा चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
दोन्ही गट भिडल्याने तणाव
दरम्यान, दोन्ही गट एकाच ठिकाणी आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. देसाईंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कडे करून अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र देसाई गटाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून आगेकूच केल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. यात काही पोलिसांना धक्काबुक्की देखील झाली.
दोन्ही गटाला परवानगी नाही?
मोर्चाच्या परवानगीबाबत पोलिसांना विचारले असता दोन्ही गटाकडून मोर्च्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नव्हती. कारवाईबाबत विचारले असता याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कराड-चिपळूण रस्त्यावर दोन्ही बाजूला पाच किलोमीटर रांगा
पाटण मतदारसंघात विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी काढलेल्या मोर्चाला पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतीमोर्चा काढत प्रतीआव्हान दिले. यावेळी नवीन बसस्थानक परिसरात तनाव निर्माण झाला. यावेळी पोलीस प्रशासनाने कराड-चिपळूण मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक रोखून धरली होती. यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे ५ किलोमीटर रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का?
गत महिन्यात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पाटण शहरातून शेतकरी ट्रॅक्टर रॅली शांततेच्या मार्गाने काढली होती. यावेळी कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी मराठा समाजाने घेतली होती. ही रॅली शांततेच्या मार्गाने होऊन समारोप देखील शांततेच्या मार्गाने झाला होता. तरीही पोलीस प्रशासनाने मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. मग शिवसेना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा, प्रती मोर्चा काढत कराड-चिपळूण मार्गावर वाहतूक कोंडी करत पाटण शहरातील शांतता बिघडवली आहे. आता या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न मराठा समाजाने विचारला आहे.