
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार नावाचा सूर्य पाहायला मिळाला की, ज्यांच्या शिस्तबद्ध कामाची पद्धत अवघा महाराष्ट्र आणि देश जाणून होता. काटेकोर वेळ पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. महाराष्ट्राच्या जनतेसाठी, राज्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारा एक कणखर माणूस म्हणजे आपले सर्वांचे अजितदादा. आजचा त्यांचा हा वाढदिवस त्यांच्याशिवाय साजरा करावा लागणार हा विचार कोणालाच पटत नाहीये.
बारामतीच्या मातीतून आपल्या राजकारणाची सुरुवात अजित पवारांनी केली. तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी दादांचा संपर्क असे. अजित दादा केवळ राजकारणी किंवा उपमुख्यमंत्री नव्हते, तर राज्याच्या जनतेशी, कार्यकर्त्यांची जोडलेला एक विश्वास होता. त्यांच्या विकासाचे व्हीजन आणि वेगाने निर्णय घेत कामे मार्गी लावण्याची ताकद होती. अनेक वर्षे त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. राज्याच्या अर्थकारणाचा डोलारा सांभाळताना त्यांनी सर्वसामान्य जनतेपासून ग्रामीण विकास ते अन्य प्रगतीसाठी महत्वाच्या गोष्टींना कायम महत्व दिले.
अजितदादा पवार केवळ एक राजकारणी नव्हते. तर प्रशासनात असलेला एक शिस्तीचा मजबूत कणा होता. ठरलेल्या दिवसभरातील कार्यक्रमांना वेळेत हजेरी लावणे, प्रत्येकाची समस्या ऐकून घेणे आणि त्या सोडवणे असा त्यांचा कामाचा धडाका होता. अजितदादा आपल्या वक्तृत्व शैलीने कायमच सर्वांना प्रभावित करत असत. अनेकदा राजकीय सभा किंवा अन्य भाषणात एखादा विनोदी भाष्य करत सर्वांना हवहवेसे वाटणारे दादा आज आपल्यात नाहीत.
CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
सत्तेत असो विरोधात अजित पवारांचे सर्वांशीच चांगले संबंध होते. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक वेळेस भूषवणारा नेता म्हणून त्यांनी रेकॉर्ड केला. विकासकामे करणे, सर्वांच्या अडचणीत मदत करणे असा त्यांचा स्वभाव होता. मात्र आज त्यांचा वाढदिवस आहे आणि दादा आपल्यात नाहीत हे दु:ख अद्याप पचवता येत नाहीये.
28 जानेवारी 2026 हा दिवस आला नसता तर किती चांगले झाले असते असे वाटते. कारण या दिवशी महाराष्ट्राने केवळ एक नेता नव्हे तर आपल्या कुटुंबाचा सदस्य गमावला. ज्या मातीने त्यांना घडवले, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आणले त्याच बारामतीमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. तो दिवस संपूर्ण महाराष्ट्राची हानी करून गेला. लाखो कार्यकर्त्यांची आणि राज्याच्या राजकारणाची कधीही न भरून निघणारी ती जखम आहे. ‘आज दादा असते तर..’ ही खंत प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी अस्वस्थ करत आहे. आज अजित दादा शरीर रूपाने आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी ठेवलेला विचार, त्यांनी मांडलेले विकासाचे व्हिजन अद्याप प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात कायम आहे.
अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण
अजित पवार यांचा राजकीय प्रवास
1982 – राजकारणात प्रवेश
1991 – सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी
1991 – पहिल्यांदा खासदार
1995 – पहिल्यांदा आमदार
(इथून पुढे सलग ७ वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी)
2022 – राज्याचे विरोधी पक्षनेते
2023 – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
28 जानेवारी 2026 – बारामतीजवळ झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात अजित दादांचे दु:खद निधन
अजित पवार यांनी तब्बल 6 वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तसेच दीर्घकाळ वित्त आणि नियोजन मंत्री दादा कार्यभार सांभाळत होते. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती.