फोटो सौजन्य - Social Media
शिवसेना शिंदे गटाने अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये पुन्हा मोठं खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनिअर आणि बिलाल इंजिनिअर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत, तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी दोन्ही माजी नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधून शिंदे गटावर विश्वास दाखवला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
या नव्या घडामोडीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा धक्का महत्त्वाचा मानला जात आहे. याआधीही राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता.
आता माजी नगरसेवक उमर आणि बिलाल इंजिनिअर यांच्या शिंदे गट प्रवेशामुळे शरद पवार गट आणखी कमजोर झाला आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितलं की, “अंबरनाथमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी अनुभवी आणि लोकसंपर्क असलेले कार्यकर्ते पक्षात येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल.”
या घडामोडीनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात शरद पवार गटात अस्वस्थता आणि शिंदे गटात नव्या उमेदीनं उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






