'माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही' ; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज जयंत पाटील यांनी स्वत: थेट व्यासपीठावरच ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून ते बोलत होते.
महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? ‘या’ मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता
राजू शेट्टी यांनी जो झेंडा हाती घेतला तो कधी सोडलेला नाही. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असते. त्यामुळे तुम्हाला हमी देणं हे जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टी आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण केलं असतं. ते झालेही असते खासदार, पण ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, ही खरी समस्या आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले.
काही दिवसांपर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर नंतर खुलासा केला होता.
Krushna Andhale Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये..; पोलीस अलर्टवर
जयंत पाटील सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषय घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे पाटील सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याने भेट झाली. सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. येणाऱ्या अधिवेशनात या 14 समस्या माझ्या दालनात बैठक लावून सोडवणार आहे, फक्त विकास कामांची चर्चा झाली. जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान आज जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही म्हटल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचं हे विधान राजू शेट्टीसंदर्भात बोलताना असलं तरी त्याचा संबंध पक्षप्रवेशाशी जोडला जात आहे.