"गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार"; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन
माणगाव: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान रायगडमध्ये महायुती अॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. 194 महाड विधानसभा महायुतीचे उमेदवार भरत शेठ गोगावले यांची प्रचार सभा 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथे पार पडली. या सभेस लोणेरे पंचायत समिती गण व मांजरवणे पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये मुस्लिम समाजातील बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. आयोजित सभेत संबोधित करताना गोरेगावचे सरपंच जुबेर भाई अब्बासी यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असूनही संकटात असताना भरतशेठ गोगावलेंनी आपल्याला केलेल्या मदतीची आठवण करून दिली. भरत गोगावले कधीही पक्ष बघत नाहीत, तर नि:पक्षपाती काम करण्याकडे त्यांचा कल असतो असं अब्बासी यांनी सांगितले. गोरेगावमध्ये जो विकास झाला तो विकास केवळ आपल्या आणि खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झाला आहे. तटकरे यांच्या आदेशाने आम्ही शब्द देतो की, या परिसरातील संपूर्ण राष्ट्रवादी भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं वचन अब्बासी यांनी उपस्थितांसमोर दिले.
हेही वाचा-राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी ! आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष
आमदार भरत शेठ गोगावले यांनी सभेत हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित केले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, रायगडचे भूमिपुत्र बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी केलेल्या महत्त्वाच्या विकास कामांची आठवण गोगावलेंनी करुन दिली. महाड विधानसभेमध्ये आपण देखील सर्व जाती-धर्मांच्या बेड्या तोडून विकास कामे करीत असल्याची जाणीव उपस्थित जनसमुदायाला करून दिली. गोगावले म्हणाले की, “विरोधकांकडे कोणतेही भांडवल नाही, गावातील हेव्या देव्यामुळे विरोधक गावात मत मागायला येतात, मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका: असं आवाहन त्यांनी केलं. गोगावले पुढे असंही म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात पहिली योजना महिलांच्या कल्याणासाठी आणली. महिलावर्ग एसटी बस मध्ये अर्ध्या तिकिटाच्या किंमतीत प्रवास करु शकतात ते केवळ महायुती सरकारमुळे. यासोबतच ‘लेक लाडली लखपती योजना’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’, ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’, ‘वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना’, ‘फुकट राशन’, ‘आनंदाचा शिधा’ आदी लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत.
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलीच तर, काल प्रकाशित झालेल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रति महा 1500 रुपये यामध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा असे आवाहन आमदार भरत शेठ गोगावले यांनी केले. पुढे ते असंही म्हणाले की, आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झाल्यापासून आमचा विचारांना मूठ माती दिली, असा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष विचार मांडला आहे, त्या विचारांशी आमची बांधिलकी अजूनही आहे. म्हणूनच मुस्लिम समाजाच्या भगिनी आज मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे उदगार सुनिल तटकरे यांनी काढले. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि याचा लाभ 2 कोटी 25 लाख महिलांना मिळाला. परंतु या योजनेला विरोध करण्याचा सामाजिक पाप महाविकास विकास आघाडीच्या सरकारने केल. ती योजना बंद पडावी म्हणून काही लोकांना हाताशी धरून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं काम यांनी केलं याची आठवण सभेस संबोधित करताना करून दिली.
संपूर्ण देशभरामध्ये विकसित राज्य अशी ओळख महाराष्ट्राची आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये अधिक वेगाने विकासाची काम भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरतशेठ गोगावले यांनी जी ताकद आपल्या पाठीशी उभी केली त्याची व्याजासहित परतफेड करा ,असे आवाहन जाहीर सभेतून तटकरे यांनी केले. जे मत तुम्ही सुनील तटकरेंना केले तेच मत भरतशेठ गोगावले यांना करा आणि पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करा, असं सुनील तटकरे यांनी जनतेला सांगितवलं आहे.