हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच महत्व आहे ते अंकाशास्त्रालादेखील. 108 या अंकाचं महत्व म्हणजे 1+0+8 या तिनही अंकाची बेरीज होते ती 9. अंकशास्त्रानुसार 9 हा पूर्णता, सिद्धी आणि ब्रह्मतत्त्व म्हणून पाहिला जातो. तुम्ही पाहिलं असेल तर की मंत्रजप करताना देखील तुळशीची माळ असो की रुद्राक्षाची यातील मणी हे देखील 108 असतात. याला अध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत. अध्यात्माच्या बाजूने पाहिलं तर, या संख्येचा संबंध विश्व, मानव शरीर आणि ऊर्जा प्रवाहाशी जोडलेला आहे.
अंकशास्त्रानुसार, 1 म्हणजे परमेश्वराचे एकत्व,0 म्हणजे शून्यता किंवा सृष्टीचे मूळ जिथून सुरुवात होते, शून्य म्हणजे नाश नव्हे तर तो प्रारंंभ असतो आणि 8 म्हणजे अनंत असणं, म्हणजे ब्रह्माचे प्रतीक. म्हणून 108 हा अंक संपूर्णतेचा आणि दैवी शक्तीचा प्रतिनिधी मानला जातो.जप करताना वापरली जाणारी माळ हीसुद्धा 108 मण्यांची असते. प्रत्येक मणी म्हणजे एक मंत्र, एक ऊर्जा केंद्र. शेवटी असणारा ‘गुरूमणी’ देवत्वाचे प्रतीक असून तो ओलांडला जात नाही, कारण तो भक्ती आणि शरणागतीचे प्रतीक आहे.म्हणूनच, 108 वेळा नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते, विचार शांत होतात आणि आत्मिक उर्जा वाढते. हा केवळ धार्मिक विधी नसून विश्वाशी जोडणारी एक अद्भुत आध्यात्मिक प्रक्रिया आहे.
यामागे शास्त्रीय दृष्टिकोनातून आहे तो असा की, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या सुमारे 108 पट आहे, तसेच पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या जवळपास 108पट आहे. यावरून दिसून येते की 108 हा अंक विश्वातील संतुलन आणि समरसतेचे प्रतीक आहे. त्यामुळे 108 वेळा मंत्रजप म्हणजे आपल्या जपाचे विश्वाशी ऊर्जात्मक संधान होणे.योगशास्त्रानुसार, मानवी शरीरात72 हजार नाड्या असतात, त्यापैकी 108 मुख्य नाड्या एकत्र येऊन हृदयाजवळील “अनाहत चक्र” येथे एकत्र होतात. मंत्रजपाचे स्पंदन या नाड्यांवर परिणाम करून शरीर, मन आणि आत्मा यांचं संतुलन राखलं जातं.






