Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
खूप वर्षांपूर्वी अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो इतका भयंकर होता की त्याच्या तोंडातून सतत आग बाहेर पडायची. त्या आगीने सगळे ऋषी, देव आणि सामान्य माणसं भाजून निघत होते. सगळीकडे हाहाकार माजला होता.तेव्हा सगळ्या देवांनी गणपती बाप्पाकडे धाव घेतली आणि वाचवा म्हणून प्रार्थना केली. बाप्पाने मग सगळ्यांच्या रक्षणासाठी त्या अनलासुराला गट्टम करून पोटातच घेतलं.राक्षसाला पोटात घेतल्यावर काय झालं, त्याच्या शरीरातल्या आगीमुळे बाप्पाच्या पोटात आणि अंगात प्रचंड जळजळ सुरु झाली. बाप्पाचा दाह वाढला. देवांनी बाप्पाला थंड करण्यासाठी चंद्र आणला, चंदनाचा लेप लावला, पण काहीच फरक पडेना.
Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
बाप्पाची आग शांत होईना.शेवटी कश्यप ऋषी आणि त्यांच्यासोबत 88 हजार ऋषींनी एक उपाय केला. प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी बनवली आणि बाप्पाच्या डोक्यावर ठेवली. दुर्वा थंड असते, औषधी असते. तिच्या स्पर्शाने बाप्पाच्या शरीरातली सगळी जळजळ क्षणात शांत झाली. बाप्पाला एकदम शांत वाटलं.तेव्हा बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणाले, जो कोणी मला दुर्वा वाहील, त्याच्यावर मी नेहमी खुश राहीन.
या कथेतूनच आपल्याला कळतं की दुर्वा का आणि कुठे वाहायची.बाप्पाचा दाह शांत करण्यासाठी दुर्वा डोक्यावर ठेवली होती, पायावर नाही. म्हणून दुर्वा नेहमी बाप्पाच्या मस्तकावर किंवा कानाजवळ ठेवावी.जर मूर्ती मोठी असेल आणि डोक्यावर दुर्वा ठेवता येत नसेल, तर 21 किंवा 108 दुर्वांची जुडी करून त्याचा हार बनवून बाप्पाच्या गळ्यात घालावा.पायावर फुलं वाहायची असतात, दुर्वा नाही. दुर्वा ही बाप्पाचं डोकं थंड करणारी वनस्पती आहे, म्हणून तिला डोक्यावरच मान आहे.
दुर्वा घेताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा. दुर्वाला नेहमी तीन पानं असतात. याला त्रिदल म्हणतात. ही तीन पानं माणसातल्या तीन गुणांची – सत्व, रज, तम यांची प्रतीकं आहेत.आणि जुडी नेहमी 21 दुर्वांचीच का करतात? कारण 21 हा आकडा बाप्पाला खूप प्रिय आहे. आपल्या शरीरातली 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, 5 महाभूते आणि 1 मन मिळून 21 होतात. म्हणून 21 दुर्वांची जुडी बाप्पाला वाहतात.तर या गणेशोत्सवात जेव्हा तुम्ही बाप्पाची पूजा कराल, तेव्हा ही छोटीशी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दुर्वा पायावर न टाकता हाताने प्रेमाने बाप्पाच्या डोक्यावर ठेवा. बाप्पा नक्कीच प्रसन्न होईल.






