सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून अनेक चांगले विषय देखील पाहायला मिळतात. सध्याचं हे धावपळीचं जग असून अनेकदा मानसिक ताण तणाव जास्त जाणवतो. या सगळ्यात काही सकारात्मक विचार रिल्समधून व्हायरल होत असतात. वृंदानमचे प्रेमानंद महाराज यांचे विचार रिल्समधून लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतात. स्पर्धेच्या या युगात करियर, नातं आणि स्वप्नांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र अनेकदा आपण चांगलं वागत असूनही जोडीदार आपल्याला फसवतो, आपल्याशी खोटं वागतो आणि या अशा कारणांनी जास्त ताण तणाव येतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये नेहमी पुरुषच नाही तर काही वेळा महिला देखील खोटं वागतात किंवा पती मानसिक त्रास देतात. यावर प्रेमानंद महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
प्रेमानंद महाराजांच्या बैठकीत एका भक्ताने महाराजांना प्रश्न केला की, जर पत्नी पतीचा मानसिक छळ करत असेल किंवा पती खोटं वागत असेल तर पतीने काय करावं ? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, कोणतंही नातं हे एका बाजूने कधीच नसतं. पती आणि पत्नीच्या नात्यात त्या दोघांची भूमिका फार महत्वाची असते. खरंतर कोणा एकामुळे नातं कधीच खराब होत नाही. जर पत्नी पतीशी चुकीचं वागत असेल किंवा खोटं बोलत असेल तर सरळ सरळ पत्नी चुकीची आहे असा अर्थ होत नाही. पत्नीच्या या वागण्यामागे नेमकं कारण काय किंवा ती अशी का वागते ? हे पतीने एकदा समजून घ्यायला हवं.
नातं हे दोघांचं असतं असंही असू शकतं की, पतीने पत्नीशी नातं सांभाळताना तिला प्रेम , आदर दिला नसेलं किंवा तिला कधी चुकीची वागणूक दिली असेल . हे आधी पतीने समजून घ्यायला हवं. आपल्या पत्नीशी आपण कधी चुकीचं वागलो का हे देखील लक्षात घेतलं तर पती पत्नीचं नातं सांभाळण्यात मदत होईल. प्रेमानंद महाराज पुढे असंही म्हणतात की, जेव्हा पत्नी पतीशी खोटं वागते तेव्हा पतीने मोकळेपणाने तिच्याशी संवाद साधणं महत्वाचं असतं. तिच्यावर खूप प्रेम केलं तिच्या विश्वास दिला तर कदाचित नातं तुटण्यापेक्षा ते आणखीच घट्ट होतं, असं उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिलं.






