फोटो सौजन्य- istock
देशभरातील लाखो शिवभक्त श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा करतात. या दिवशी आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शंकराला प्रिय असलेले बेलाचे एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
यंदा शेवटच्या श्रावणी सोमवारी अमावस्या आहे. यावर्षी पाच श्रावणी सोमवार आले आहेत. या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवारीच झाली होती, तर शेवटही सोमवारीच होत आहे. त्यामुळे तब्बल 72 वर्षांनी हा शुभ योग आलाय. मागील चार सोमवारी शंकराला शिवामूठ वाहायला जमलं नसेल तर, शेवटच्या सोमवारी भगवान महादेवाला मूठभर ‘सातूची शिवामूठ’ नक्की अर्पण करा.
हेदेखील वाचा- सोमवारी पूजेच्या वेळी चंद्र चालिसाचे पठण करा
सातू म्हणजे नक्की काय?
सातू एक धान्य आहे. सातूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. यात जीवनसत्व आणि इतर पोषक घटक जास्त असतात. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं सातूला खूप महत्त्व आहे.
ओटस्, गहू, राई आणि तांदूळ यांसारखी धान्ये आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. कारण, संपूर्ण धान्यामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये प्रथिने, फायबर, ब जीवनसत्त्वांसह लोह, जस्त यांसारख्या खजिनांचा समावेश त्यामध्ये असतो.
हेदेखील वाचा- मूलांक 9 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया
सातू खाण्याचे आरोग्यदायी फायदे
सातूचे सेवन केल्याने पचन चांगले होते. तसेच वजन कमी होते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे सातत्याने सातूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
महादेवाची पूजा करण्याची पद्धत
सोमवारी सकाळी स्नान झाल्यानंतर उपवास करून महादेवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा. यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळं, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.
सायंकाळी सूर्यास्तानंतर देवापाशी दिवा लावून उदबत्ती ओवाळावी. महादेवाची आरती करावी. त्यानंतर घरभर कापूर आरती फिरवावी. नंतर महादेवाला पांढरे फूल आणि बेल अर्पण करावे. त्यानंतर आकाशाकडे बघून चंद्राला स्मरुन तुळशी जवळ चंद्रासाठी एक फूल वाहवे.
भारतीय संस्कृतीची शिकवण
आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्वी महिलांनी अर्पण केलेले धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिले जायाचे. त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं. ज्यांना मंदिरात जाता येत नाही, त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावे.