फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत करतात. नवविवाहित महिलांसाठी पहिली वटपौर्णिमा विशेष उत्साह, श्रद्धा आणि आनंदाने साजरी केली जाते. या दिवशी पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यास अखंड सौभाग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि वैवाहिक जीवनात आनंद लाभतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
सौभाग्यासाठी प्रत्येक विवाहित महिला वटसावित्रीचे म्हणजेच वटपौर्णिमेचे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी तपश्चर्या करून यमाकडून आपल्या पतीला पुन्हा मिळवले होते. त्यामुळे यादिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. त्यामुळे प्रथम वटपौर्णिमेच्या व्रतासाठी प्रत्येक महिला खूप उत्सुक असते. यंदाची वटपौर्णिमा आज सोमवार, 29 जून रोजी आहे. मात्र काहीजणींना व्रत कसे करावे, तसेच वटसावित्रीची पूजा कशी करायची याबद्दल योग्य माहिती नसते. त्यामुळे खास नववधू आणि प्रथम वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या विवाहित महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करायची ते जाणून घेऊया
नवविवाहित महिला लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने फारच उत्सुक असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवतांचे आशीर्वाद घ्यावेत.
प्रत्येक महिलेला नटायला आवडते. त्यामुळे वडाच्या पूजेसाठी तयार होताना सर्वप्रथम साज शृंगार करावा. हा दिवस तर विशेष असल्याने यादिवशी महिला आपल्या पतीसाठी सोळा शृंगार करतात. त्यामुळे छान दागदागिने घालावेत. पारंपरिक दागिने असतील तर ते नक्की घाला यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
नवविवाहित महिलांसाठी शृंगारातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडी. काहीजण यादिवशी पारंपरिक नऊवारी साडी नेसतात. तर अनेकजणी भरजरी साडी नेसतात. काहींच्या घरची रीत असते यादिवशी लग्नातील शालू किंवा सप्तपदीची साडी नेसण्याची. यामागचे कारण म्हणजे लग्नातील पवित्र विधी तुम्ही त्या साडीवर केलेले असतात त्यामुळे त्या वस्त्राला देखील पावित्र्य आणि सौभाग्य लाभलेले असते म्हणून जमल्यास लग्नातील शालू किंवा साडी नेसावी.
सोळा शृंगार करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातातील बांगड्या. आपल्याकडे हिरव्या बांगड्याना विशेष महत्व असते. लग्नात देखील हिरवा चुडा भरला जातो. त्याप्रमाणेच यादिवशी देखील नवविवाहित महिला हिरव्या बांगड्या घालतात. भांगेत कुंकू भरून कपाळी टिकली लावून शृंगार करून त्या अगदी नववधूसारख्या दिसूनच आपली प्रथम वटपौर्णिमा साजरी करतात.
व्रत करताना काहीजणी दिवसभर व्रत करतात तर काहीजणी वटपूजा झाल्यानंतर व्रत सोडतात. मात्र हा उपवास दिवसभर करून तो दुसऱ्या दिवशी सोडण्याची काहींच्या घरची पद्धत असते. तुम्ही तुमच्या कौटुंबिक रीतीप्रमाणे व्रत करू शकता. तसेच वडपूजा करताना पूजेचे सामान घेऊन वडाच्या झाडाशी जावे. झाडाला नमस्कार करून हार फुले हळदीकुंकू वहावे. पाचफळे ठेवावीत. साजशृंगाराचे सामान पूजेत असते ते देवी सावित्रीला वडाच्या झाडाशी अर्पण करावे. पांढरा धागा वडाला सात प्रदक्षिणा घालून बांधावा. यामुळे आपले सौभाग्य वाढते असे मानतात.
धार्मिक श्रद्धेनुसार वटपौर्णिमेचा उपवास हा सावित्री माता आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या कथेशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की पतीवरील अढळ प्रेम, तपश्चर्या आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सावित्री मातेने यमराजाकडून आपल्या पतीचा जीव परत मिळवला. तेव्हापासून, हा उपवास अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात वटवृक्षालाही पवित्र मानले जाते. त्याचे दीर्घायुष्य आणि विशाल आकार हे स्थिरता, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा नववधूच्या वैवाहिक जीवनातील महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्य, सुखी संसार आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत केले जाते
Ans: पूजा श्रद्धा आणि भक्तिभावाने करावी, घरातील परंपरेचे पालन करावे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि शक्य असल्यास दानधर्म करावा.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी आणि कुटुंबाचे मंगल होण्याची श्रद्धा आहे.






