पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी(फोटो-सोशल मीडिया)
सुनयना सोनवणे/पुणे : भारतीय नौदलाच्या भावी सागरी इतिहासाचे दालन ठरणाऱ्या भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी पुण्यात दि. ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. नौदल सेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भारतीय नौदलाचा वारसा आणि भविष्यातील सागरी दृष्टिकोन एकत्र आणणारा हा प्रकल्प नौदल दिवसाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्वाचा ठरणारा आहे.
हेही वाचा : भारताचा नवा अवतार पाहिलात का? T20 World Cup 2026 साठी BCCI कडून नव्या जर्सीचे अनावरण
भारतात सध्या एकूण सात नौदल सागरी संग्रहालय आहेत. कोची (केरळ), पोर्ट ब्लेअर( अंदमान आणि निकोबार), लोथल (गुजरात), मुंबई ( महाराष्ट्र ), विशाखापट्टणम(आंध्र प्रदेश),गोवा आणि आता पुण्यातील हे आठवे संग्रहालय असेल.
नेव्ही फाउंडेशन पुणे चॅप्टर (एनएफपीसी)चे अध्यक्ष व्हाइस ॲडमिरल जयवंत कोर्डे (निवृत्त) यांनी संग्रहालयाच्या भावी आराखड्याचे संक्षिप्त प्रात्यक्षिक सादर केले. या प्रकल्पात नौदलातील अनुभवी माजी सैनिक आणि पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे प्राध्यापक यांचा संयुक्त सहभाग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. त्यांच्या सागरी दूरदृष्टीचा गौरवशाली इतिहास व्यापक पातळीवर पोहोचवणे हे आगामी सागरी संग्रहालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुण्यात हे संग्रहालय उभारल्याने शहराला नौदल वारसा, सार्वजनिक संपर्क, सामरिक संवाद आणि विचार-मंथनाचे केंद्र म्हणून नवे स्थान मिळणार आहे. नेव्ही फाउंडेशन पुणे चॅप्टरचा उद्देश नौदलाचा वारसा अंतर्गत शहरात दृश्यमान करणे, शिवाजी महाराजांचे सागरी योगदान अधोरेखित करणे आणि नौदलाशी संबंधित नवीन पिढीसाठी प्रेरणादायी व्यासपीठ तयार करणे हा आहे.
संग्रहालय हे नौदलाच्या प्रतिमा संवर्धन, भरती मोहीम, तसेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स (एसटीइएम) यांबद्दल मार्गदर्शन देणारे केंद्र म्हणूनही कार्य करेल. उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि नौदल यांच्या समन्वयाचा उच्च दर्जाचा मंचही येथे उपलब्ध केला जाणार आहे.
संग्रहालयात पारंपरिक वस्तूंपासून ते अत्याधुनिक सादरीकरणापर्यंत सर्व काही असेल. डिजिटल माध्यमे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना अनुभवात्मक दर्शनाची अनुभूती देण्यात येणार आहे.
या संग्रहालयात पूर्व-मध्ययुग ते मध्ययुगीन काळ, मराठा नौदल ते रॉयल भारतीय नौदल, रॉयल भारतीय नौदल ते आधुनिक भारतीय नौदल आणि व्यापारी नौदल अशा प्रमुख चार गॅलरी असतील. याशिवाय, तटीय किल्ले, प्राचीन जहाजे, व्यापार मार्ग, आधुनिक नौदल शक्ती, नौदलातील मालमत्ता व कारवाई, नौदल परंपरा व शिक्षण या मूळ विषयांवर प्रदर्शने मांडली जातील.
पर्यटकांसाठी ‘वार-रूम सिम्युलेशन’, ‘वॉटर रूम’, ‘शिप-बिल्डिंग झोन’ आणि बालकांसाठी खेळ व शिक्षण क्षेत्र अशा अनेक सुविधा असतील. विद्यार्थी, एनसीसी तसेच नौदल कर्मचाऱ्यांची मुले यांच्यासाठी विशेष थिएटर आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
व्हाइस ॲडमिरल कोर्डे यांनी संग्रहालयाची दृष्टी ‘आय थ्री’ (इमर्स, इन्फॉर्मेशन आणि इमर्स) माहिती द्या, अनुभव द्या आणि प्रेरणा द्या या तीन तत्त्वांवर आधारित असेल असे सांगितले. त्यानुसार संग्रहालयाची रचना ‘खेळा, शिका, घडवा, नवकल्पना करा आणि योगदान द्या’ या पाच मूलभूत तत्त्वांवर उभारली जाणार आहे.
पुण्यातील सागरी संग्रहालयाची पायाभरणी हा भारतीय नौदलाच्या भव्य इतिहासाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या भावी प्रवासाचा संगम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दृष्टीला जागतिक सन्मान मिळवून देणारा हा उपक्रम, पुण्याला नौदल वारशाच्या केंद्रस्थानी नेणारा ठरत आहे.






