फोटो सौजन्य - istock
तरुणाईमध्ये ‘ड्रग्ज’ घेणं हे आजकाल ट्रेंड बनत चालले आहे. स्वत:ला ‘कूल’ दाखवण्याच्या नादात तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचे सेवन वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एका युवकाचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण कोणत्याही व्यसनाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. दारु असो वा सिगारेट यांच्या सेवनामुळे जीवघेणे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांमुळे आरोग्यास हानी पोहचते. याबाबत जागृती करण्यासाठी ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’ची सुरूवात करण्यात आली. यादिवसाची सुरूवात कशी झाली हे आपण जाणून घेऊयात.
सुरूवात का व कधी झाली?
धकधकीच्या काळात तणावापासून आराम मिळण्यासाठी लोकांनी सिगरेट, दारू अन्य अमली पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली. यांच्या सेवनाने लोकांना आनंद मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे सेवन वाढले. तरुणाईही या पदार्थांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रणात सेवन करु लागली आहे. किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. तसेच या पदार्थांची अवैध तस्करीही सुरू आहे.
या कारणास्तव 7 सप्टेंबर 1987 रोजी ‘संयुक्त राष्ट्र संघा’कडून समाजाला अमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला गेला. 26 जून ला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. जे सर्व देशांनकडून ते स्वीकारण्यात आले. तेव्हापासून ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ दरवर्षी 26 जून रोजी साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्व
लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरुक करण्यासाठी तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच ड्रग तस्करी रोखण्यासाठीही या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. आज जगभरात अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत आहे. त्यातून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. भारतातही ड्रग्जची अवैध तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे आहेत.
अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम
• कोणत्याही स्वरूपातील ड्रग्जचे सेवन शारीरिक आणि मानसिकरित्या कमकुवत बनवते.
• अमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्ती हिंसक बनते.
• मद्यपान आणि सिगारेटच्या सेवनामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका निर्माण होतो.
• उच्च रक्तदाब, पॅरालिसिस आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता या पदार्थांच्या सेवनाने वाढते.
• पोट, स्तन, तोंड आणि घशाचा कर्करोग देखील होऊ शकतो.