(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
६ डिसेंबर १९५६ च्या काळ्या दिवसाने भारताला हादरवून ठेवले. कारण यादिवशी संविधानाचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे प्रतीक आणि लाखो वंचितांसाठी आशा असलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांनी जीवनात अखेरचा श्वास घेतला आणि अनेक वंचितांना अनाथ केलं. त्यांच्या निधनानंतर, ६ डिसेंबर हा दिवस “महापरिनिर्वाण दिवस” म्हणून ओळखला जातो, जो केवळ भारतीय समाजाच्या स्मृतीचा दिवस नाही तर समानतेसाठी संघर्ष सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा देखील आहे.
महापरिनिर्वाण म्हणजे काय?
महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचे तत्त्व आणि ध्येय आहे. या शब्दाचा मूळ अर्थ आहे, ‘मृत्यूनंतर निर्वाण प्राप्त करणे’. बौद्ध धर्मानुसार, जो व्यक्ती ‘निर्वाण’ प्राप्त करतो, तो सांसारिक इच्छा आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो. ‘महापरिनिर्वाण’ प्राप्त झाल्यानंतर ती व्यक्ती जीवनाच्या चक्रातून मुक्त होते आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. निर्वाण प्राप्त करणे सोपे नाही. त्यासाठी व्यक्तीने सद्गुणी आणि नीतिमान जीवन जगणे आवश्यक असते. बौद्ध धर्मात, जेव्हा भगवान गौतम बुद्ध यांनी वयाच्या ८० व्या वर्षी आपले शरीर त्यागले, त्या घटनेला महापरिनिर्वाण असे म्हटले जाते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस अभिवादन करत बाबासाहेबांचे दर्शन घेतील. ही परंपरा हळूहळू राष्ट्रीय स्तरावर पसरली आणि महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यांनी या दिवसाला अधिकृत स्मृतिदिन म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली. कालांतराने, हा दिवस भारताच्या सामाजिक-राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय बनला आहे.
महापरिनिर्वाण दिवस हा केवळ आंबेडकरांचा स्मृतिदिन दिवस नाही, तर तो भारताच्या सामाजिक व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या विचारसरणीचे प्रतीक आहे.
अनेक राज्यांमध्ये ६ डिसेंबर हा दिवस राज्य श्रद्धांजली दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस देखील असतो. सरकारी आस्थापनांमध्ये संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचा पुनरुच्चार करून डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली जाते. केंद्र आणि राज्य पातळीवर आयोजित कार्यक्रम ठेवले जातात ज्याचा उद्देश आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संवैधानिक मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे आहे.
डॉ. आंबेडकरांचे जीवन संघर्ष, अभ्यास आणि न्यायाच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक होते. त्यांचा संघर्ष हा लाखो लोकांना आणि पुढील पिढयांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी होता. महापरिनिर्वाण दिन हा केवळ त्यांच्या निधनाचे स्मरणोत्सव नाही तर अशा भारताच्या स्वप्नाचे प्रतिबिंब आहे जिथे प्रत्येक नागरिक समान हक्कांसह उभा राहू शकेल. दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस आपल्याला शिकवतो की सामाजिक बदल केवळ कल्पनांद्वारेच शक्य नाही, तर त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याच्या धाडसाद्वारे सर्व शक्य आहे.






