Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा गौरव दिनासोबतच मराठी राजभाषा दिवसदेखील साजरा केला जातो. बऱ्याचदा या दोन्हीमधील फरक समजून घेण्यात अनेकांची चूक होते. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Marathi Rajbhasha Din 2025 : आपली मायबोली मराठी ही फक्त एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक ओळखीची शान आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, ती आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि साहित्यिक समृद्धतेचे मूर्तस्वरूप आहे. या भाषेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दोन विशेष दिवस साजरे केले जातात – मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि मराठी राजभाषा दिन (१ मे). मात्र अनेकदा या दोन्ही दिवसांमध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणूनच या दोघांमधील स्पष्ट भेद समजून घेणे गरजेचे आहे.
या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी भाषिकांमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज, अर्थात विष्णू वामन शिरवाडकर, हे मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या काव्यलेखन, कथा, नाटक आणि सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून मराठी भाषेला जागतिक साहित्याच्या व्यासपीठावर नेऊन ठेवले. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य शासनाने अधिकृतपणे हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जाहीर केला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे मातृभाषेचा गौरव, कुसुमाग्रजांच्या कार्याची आठवण आणि नव्या पिढीत भाषेचे भान निर्माण करणे.
महत्त्व:
1. शाळा, महाविद्यालये आणि साहित्यिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
2. कविसंमेलने, भाषण स्पर्धा, मराठी ग्रंथांचे प्रदर्शन, नाट्याविष्कार यांसारख्या उपक्रमांनी दिवस समृद्ध केला जातो.
3. नव्या पिढीत मराठीचे महत्त्व रुजवण्याचा एक सशक्त प्रयत्न या दिवशी केला जातो.
हे देखील वाचा : International Labor Day 2025: काय आहे ‘या’ खास दिवसमागची रंजक कथा? आणि कामगार संघर्षाचा जागतिक इतिहास
मराठी भाषेला राज्याच्या प्रशासकीय व्यवहारातील अधिकृत स्थान देण्यासाठी १९६४ मध्ये ‘मराठी राजभाषा अधिनियम’ संमत करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ११ जानेवारी १९६५ रोजी अधिनियम प्रकाशित झाला आणि १९६६ पासून अंमलातही आला.
त्यानंतर, १ मे हा दिवस, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी, ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला.
महत्त्व:
1) हा दिवस शासकीय यंत्रणांमध्ये मराठी भाषेच्या वापरावर भर देण्यासाठी साजरा केला जातो.
2) शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यात मराठीच्या वापराचे प्रोत्साहन दिले जाते.
3) विविध सरकारी आस्थापनांमध्ये कार्यशाळा, परिसंवाद, भाषाविषयक सूचना देण्यात येतात.
मराठी एक सम्पूर्ण भाषा है।
इसलिए मराठी में शूरता भी है, वीरता भी है।
मराठी में सौंदर्य है, संवेदना भी है, समानता भी है, समरसता भी है।
इसमें अध्यात्म के स्वर भी हैं और आधुनिकता की लहर भी है।
मराठी में भक्ति भी है, शक्ति भी है और युक्ति भी है।
– पीएम श्री @narendramodi
पूरा… pic.twitter.com/uz3Rasnx5T
— BJP (@BJP4India) February 21, 2025
credit : social media
बऱ्याचदा नागरिकांना वाटते की २७ फेब्रुवारी आणि १ मे हे दोन्ही ‘मराठी भाषा दिन’ म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्षात, दोन्ही दिवसांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहे.
1. २७ फेब्रुवारी – भाषेच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक गौरवाचा दिन
2. १ मे – भाषेच्या प्रशासकीय मान्यतेचा आणि अंमलबजावणीचा दिन
हे देखील वाचा : Maharashtra Day : 1 मे रोजी महाराष्ट्राची स्थापना कशी झाली? जाणून घ्या 63 वर्षांचा गौरवशाली इतिहास
मराठी ही केवळ राज्याची राजभाषा नसून, आपल्या अस्मितेची शान आहे. दोन्ही दिवस हे भाषेच्या वेगवेगळ्या अंगांनी समृद्ध करण्याचे साधन आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवसांचे वेगळेपण समजून घेऊन, त्याचे सन्मानाने आणि अभिमानाने पालन करणे ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे.
जय मराठी, जय महाराष्ट्र!