भारत-पाकिस्तान सीमारेषा आखणाऱ्या व्यक्तीने कधीच भारत पाहिला नव्हता, जाणून घ्या फाळणीची 'ती' न सांगितलेली कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Independence Day 2025 : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, ७८ वर्षांपूर्वी घडलेल्या एका ऐतिहासिक आणि हृदयद्रावक घटनेची आठवण होते फाळणीची कहाणी. देशाच्या नकाशावर आज ज्या भारत-पाकिस्तान सीमारेषा दिसतात, त्या आखणारा माणूस असा होता, ज्याने त्या आधी कधीही भारतीय भूमीवर पाऊलसुद्धा ठेवले नव्हते. त्याचे नाव होते सर सिरिल रॅडक्लिफ.
ब्रिटनमधील सुप्रसिद्ध वकील सर सिरिल रॅडक्लिफ यांची सीमा आयोगाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या या उपखंडाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना फक्त ५ आठवडे दिले. त्यांना पंजाब आणि बंगालचे विभाजन करून हिंदू आणि मुस्लिम बहुल भागांच्या आधारे दोन राष्ट्रे भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु रॅडक्लिफ यांना भारताचा भूगोल, राजकारण वा सांस्कृतिक पार्श्वभूमीची कोणतीही माहिती नव्हती.
हे देखील वाचा : 15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा
रॅडक्लिफ यांच्याकडे असलेली माहिती जुनी जनगणना, आकडेवारी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे अहवाल इतकीच होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती गावे, शहरे, जिल्हे हे धार्मिकदृष्ट्या एकसंध नव्हते. हिंदूबहुल गावाच्या मध्यभागी मुस्लिम वस्ती तर मुस्लिमबहुल भागात हिंदू गावे होती. धर्माच्या आधारावर रेषा आखण्याचा प्रयत्न करताना, वास्तवातील ही मिसळलेली लोकसंख्या मोठा अडथळा ठरली.
स्वातंत्र्यानंतर फक्त दोन दिवसांनी, १७ ऑगस्ट १९४७ रोजी, रॅडक्लिफ यांनी आखलेली सीमा जाहीर झाली. उद्दिष्ट होते हिंसाचार टाळणे, परंतु निकाल उलट लागला. या रेषेने एका क्षणात लाखो लोकांना दुसऱ्या देशाचे नागरिक बनवले. पंजाब आणि बंगालमध्ये भयानक दंगली उसळल्या. गावे पेटली, मृतदेहांनी भरलेल्या गाड्या चालू लागल्या, आणि या हिंसाचारात १० ते १५ लाख लोकांनी जीव गमावला. लाखो लोक विस्थापित झाले.
या घटनांनी रॅडक्लिफ यांना खोलवर हादरवले. भारत सोडण्यापूर्वी त्यांनी आपली सर्व कागदपत्रे जाळून टाकली, जेणेकरून त्यांच्या निर्णयांबद्दल पुढे कोणताही वाद निर्माण होऊ नये.
हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी
“जर मला या कामाचे गांभीर्य आणि त्याचे परिणाम आधीच कळले असते, तर मी हे काम कधीही स्वीकारले नसते.”
आज, स्वातंत्र्यदिनाच्या या पर्वावर, ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की एका अनभिज्ञ माणसाच्या पाच आठवड्यांच्या निर्णयाने लाखो लोकांचे जीवन कायमचे बदलून गेले. भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा हा फक्त नकाशावरील एक रेषा नसून, ती असंख्य जखमा, अश्रू आणि बलिदानांची साक्ष देणारी वेदनांची कहाणी आहे.