अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा 'पर्यावरणपूरक' उपाय
“पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग मी प्लास्टिक आहे असं समजा साहेब!” मुळशी पॅटर्न चित्रपटातील हा डायलॉग चांगलाच गाजला. आज बाजारातून कोणतीही वस्तू घरी आणण्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो. एवढंच काय, साधा टपरीवरील चहा पार्सल घेतानाही आपल्याला तो प्लास्टिकच्या पिशवीतच बांधून दिला जातो. यामुळे प्लास्टिकचा खच तर वाढतोच आहे, पण कॅन्सरसारखा मोठा धोका सुद्धा निर्माण होत आहे.
गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवल्यास त्यातील रसायनं वितळून त्या पदार्थात मिसळतात. हेच पदार्थ आपल्या पोटात जातात आणि आरोग्य बिघडवू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला देतात.
खरंतर, अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत की प्लास्टिक कधीच नष्ट होत नाही. मात्र, मुलुंडच्या अस्मिता गोखले आणि त्यांच्या अथक फाउंडेशनने ही समजूत खोटी ठरवली असून गेली नऊ वर्षे ते प्लास्टिक निर्मूलनाचं काम करत आहेत. नुकतंच अस्मिता गोखले यांनी या सकारात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष मुलाखतीत दिली.
येत्या फेब्रुवारी 2026 ला आमच्या प्लास्टिक निर्मूलनाच्या कार्याला नऊ वर्षं पूर्ण होत आहेत. या काळात आम्ही लोकांकडून प्लास्टिक गोळा करत आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही दारोदार जाऊन प्लास्टिक गोळा करतो. आम्ही लोकांना “माझं प्लास्टिक, माझी जबाबदारी” याची सवय लावली आहे. त्यानुसार लोक स्वतःहून त्यांचं प्लास्टिक आम्हाला सुपूर्त करतात आणि त्यावर प्रक्रिया करून ते नष्ट केलं जातं.
कॅन्सर हा जगातील सर्वात मोठा आजार आहे आणि त्यामागे एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्लास्टिक. मात्र, याविषयी कोणी ठोस काम करत नव्हतं. अशा वेळी आम्ही हे काम हाती घेतलं आणि ते सातत्याने नऊ वर्षांपासून सुरू आहे.
खरं तर प्लास्टिक वाईट नाही. त्याच्या उत्पादनाची सुरुवात आपल्यासाठी झाली. पूर्वी वस्तू ठेवण्यासाठी काच आणि मातीची भांडी वापरली जायची, पण ती तुटायची. यालाच पर्याय म्हणून प्लास्टिक आलं. मात्र, जेव्हा प्लास्टिकचा अतिवापर सुरू झाला तेव्हा ते वाईट ठरलं.
लोकांना प्लास्टिकच्या तोट्याबाबत माहिती आहे. पण ते म्हणतात सरकारने प्लास्टिक बंद करावं. पण आपण वापरलेल्या प्लास्टिकची जबाबदारी आपली नाही का? ती सरकारवर ढकलून कसं चालेल? म्हणूनच आम्ही लोकांना “माझं प्लास्टिक, माझी जबाबदारी” ही सवय लावली.
फेब्रुवारी 2017 मध्ये आम्ही पहिला ड्राइव्ह सुरू केला. त्यावेळी लोकांना बोलावून प्लास्टिकच्या तोट्याबाबत माहिती दिली. काहींनी टाळ्या वाजवल्या, तर काहींनी म्हटलं, “हा फक्त दिखावा आहे, दोन-चार महिने करतील आणि बंद पडतील.” अशा प्रतिक्रियांमुळे लोकांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सबुरी ठेवली. नंतर लोकांचा प्रतिसाद वाढू लागला.
लोकं म्हणतात आम्ही प्लास्टिक रिसायकल करतो. आजकाल वापरलेल्या प्लास्टिकमधून कपडे, बॅग किंवा शोभेच्या वस्तू तयार होतात. पण या वस्तू ५–१० वर्ष टिकल्या तरी पुढे त्या खराब झाल्यावर त्याचं काय? त्या वस्तूतील प्लास्टिक वेगळं करून फेकता येतं का? म्हणूनच आमच्या मते, प्लास्टिक रिसायकल म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं.
आमचा ड्राइव्ह दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो. या दिवशी लोक त्यांच्याकडील प्लास्टिक आम्हाला देतात. अथक फाऊंडेशनने पुण्यातील जीडीपीएल या कंपनीशी सहकार्य केलं आहे. या कंपनीतील वैज्ञानिकांनी एक विशेष मशीन तयार केलं आहे, जे प्लास्टिक पूर्णपणे नष्ट करतं.