फोटो सौजन्य: गुगल
आज प्रत्येक समाजातील व्यक्ती शिकून सवरुन उच्च पदावर नोकरीला लागते व्यवसाय करते. याला अपवाद स्त्रिया देखील नाही. आताच्या काळातील गृहीणी असो किंवा उच्च शिक्षित नोकरदार स्त्रिया, घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यात पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील पुढे आहेत. मात्र एक तो काळ असा होता जिथे शिक्षणाचा ‘श’ लिहिणं तर सोडाच पण उच्चारणं म्हणजे स्त्रियांनी घोर अपराध करणं मानलं जायचं. त्या काळात शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करुन, अंधश्रद्धेचा गंज चढलेल्या समाजाला लाभलेला परिसस्पर्श म्हणजे क्रांतीसूर्य जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले.
या थोर समाजसुधारक पती पत्नीचं कार्य देशात नाही तर संपूर्ण विश्वात गाजत आहे. शिक्षणाने , ज्ञानाने मोठं करणारे हे मायबाप रंजल्या गांजल्या समाजाचा आणि सोशिक स्त्रियांचा आधारस्तंभ झाले. अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेणाऱ्या सावित्रीबाई आणि जोतिराव यांचं नातं देखील तितकंच त्यांनी हाती घेतलेल्या कार्यासारखं प्रखर, तेजस्वी आणि निर्मळ होतं. जोतिरावांनी हाती घेतलेल्या धगधगत्या कार्यामध्ये जातीबंधनाच्य़ा, अंधश्रद्धेच्या अनेक निखांऱ्यावरुन चालण्याची तयारी सावित्रीबाईंनी दाखवली. कारण शिक्षणाचं महत्त्व त्यांना जोतिरावांनी पटवून दिलं होतं.
असं म्हटलं जात की, पती-पत्नी हे आयुष्यभराचे सोबती असतात .आयुष्य़ातल्या प्रत्येक सुखदु:खात एकमेकांना साथ देणारे, जोतिराव आणि सावित्रीमाईने प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांची साथ कधी सोडली नाही. याबाबतीतला एक प्रसंग आहे, एकदा सावित्रीबाईंनी जोतिरावांकडे लुगडं मागितलं होतं.
बरेच दिवस त्या जोतिरावांकडे लुगडं मागत होत्या. एके दिवशी अचानक सावित्रीबाईंना ताप भरला. एका लुगड्यासाठी ताप काढणाऱ्यातली सावित्री नाही. हे जोतिरावांनी पुरेपुर ओळखलं होतं. या सगळ्याच्या मागचं कारण शोधण्यासाठी जोतिराव सावित्रीबाईंच्या मागून शाळेत जात होते.
मुलींची शाळा सुरु करण्याचा निर्धार केल्यानंतर शाळेत जाताना सावित्रीबाईंवर समाजकंटक चिखल आणि शेण फेकायचे. सावित्रीबाई शाळेत गेल्यावर ते लुगडं धुवायच्या धुतलेलं ओलं लुगडं नेसून शिकवायच्या. सतत ओले कपडे अंगावर घेऊन सावित्री मुलींना शिकवण्यात खंड पाडू देत नाही, याची जाणिव होताच जोतिरावांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सावित्रीबाईंना नवं लुगडं घेऊन दिलं.
अंधश्रद्धेच्या वादळात गुरफटलेल्या समाजाला वाट दाखवण्यासाठी जोतिराव आणि सावित्रीबाईंचं आयुष्य चंदनासारखं झिजलं. समाजाचं हित पाहताना या पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास देखील तितकाच दृढ होता. आज प्रत्येक स्त्री सन्मानाने शिक्षण घेतेय प्रत्येक समाज सुजाण होतोय तो प्रत्येक जण जोतिरांवाचे ऋणी आहेत.
सर्वसामान्य असं म्हटलं जातं की, यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर स्त्री असते. मात्र सावित्रीबाई पहिल्या मुख्याध्य़ापिका बनण्यात जोतिरावांचा मोलाचा वाटा होता. सावित्रीमाई वटवृक्ष झाली, कारण या वटवृक्षाचे मातीत खोलवर रुजणारी मूळं जोतिराव होते. जोतिरावांवरील हेच प्रेम व्यक्त करताना सावित्रीमाईंनी कविता लिहीली होती.
माझ्या जीवनात जोतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला
ऐसा भाग्यवंत असेल तुजला नसे आनंदाला पारावार
थोरे बाळ ऐसे, भवंजंजाळाचे ओझे, वाहण्याचे काम तुझे
करुन प्रपंच आहे तो कठीण बोलून हा शीण जाईल का
शांतता आपुली ठेवावी प्रपंची ही वाट साची संसारात
माझ्या जीवनात जोतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला
आजच्या 198 व्या जयंती निमित्ताने क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांना त्रिवार वंदन !