Shaheed Diwas 2025: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात साजरा केला जातो शहीद दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ पाळला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी संपूर्ण देशभरात श्रद्धांजली अर्पण केली जाते.
या दिवशी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मान्यवर राजघाट येथील गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतात. यानंतर संपूर्ण देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळले जाते आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला जातो.
30 जानेवारीचा ऐतिहासिक संदर्भ
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, 30 जानेवारी 1948 रोजी, महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या झाली. नथुराम गोडसे या कट्टर विचारसरणीच्या व्यक्तीने बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेदरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गांधीजींच्या या दुर्दैवी निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. याच कारणास्तव 30 जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शांततामय मार्गाने सत्याग्रह चळवळीचे नेतृत्व केले. असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळातच ते असहिष्णुतेच्या बळी ठरले.
शहीद दिवसाचे महत्त्व
शहीद दिवस केवळ गांधीजींना नव्हे, तर स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या प्रत्येक हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतभर शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात येतो. विविध ठिकाणी चर्चासत्रे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शहीद दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका खरंच भारताला फक्त शस्त्रे विकू इच्छितो, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदयात दडलाय ‘चोर’?
30 जानेवारी आणि 23 मार्च – दोन शहीद दिवस का?
भारतात दरवर्षी दोन वेळा शहीद दिवस पाळला जातो. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर 23 मार्चला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मरणार्थही या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.
23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा दिली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या क्रांतिकारकांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी जेम्स साँडर्स याची हत्या केली होती. यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना देशद्रोही ठरवत फाशी देण्याचा निर्णय घेतला. या तीन क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे हा दिवसही ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन बनवतोय जगातील सर्वात धोकादायक अणुबॉम्ब; ड्रॅगनच्या ‘या’ सिक्रेट फॅसिलिटीमुळे जगाला धोका
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
शहीद दिवस हा केवळ श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस नसून, त्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्त्वांवर भर देत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आजच्या पिढीनेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या एकतेसाठी योगदान द्यावे, अशी भावना या दिवसाच्या निमित्ताने जागृत होते. 30 जानेवारी आणि 23 मार्च या दोनही दिवसांचे देशाच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या काळातही, गांधीजींच्या विचारांनुसार अहिंसा आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जात आपण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.