World Family Doctors Day : आज आहे 'जागतिक कुटुंब डॉक्टर दिन' जाणून घ्या 'हा' दिवस का आहे खास? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Family Doctors Day : आज १९ मे, संपूर्ण जगभरात ‘जागतिक कुटुंब डॉक्टर दिन’ (World Family Doctor Day) मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात येत आहे. २०१० साली जागतिक कुटुंब डॉक्टर संघटना (WONCA – World Organization of National Colleges, Academies and Academic Associations of General Practitioners/Family Physicians) यांच्या पुढाकाराने प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी, आरोग्य क्षेत्रातील कुटुंब डॉक्टरांचे योगदान, समर्पण आणि त्यांचे समाजातील स्थान अधोरेखित करण्यात येते. भारतात अकादमी ऑफ फॅमिली फिजिशियन्स ऑफ इंडिया (AFPI) या संस्थेने हा दिवस विशेष कार्यक्रमांद्वारे साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे.
भारतात “फॅमिली डॉक्टर” ही संकल्पना नवखी नाही. मागील अनेक पिढ्यांपासून घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक विश्र्वासू डॉक्टर असायचा जो केवळ वैद्यकीय उपचारच करत नसे, तर एक मार्गदर्शक, सल्लागार व भावनिक आधार देखील असे. आजही ग्रामीण भागात आणि अनेक शहरी भागांतही फॅमिली डॉक्टरांवर असलेला विश्वास टिकून आहे. त्यांचे परवडणारे शुल्क, सुलभ उपलब्धता आणि सर्वांगीण उपचार पद्धती यामुळे सामान्य नागरिकांसाठी ते आजही पहिला आरोग्यसंपर्क आहेत.
गेल्या काही दशकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात विविध सुपर स्पेशॅलिटीज आणि तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली आहे. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड अशा अवयवविशिष्ट तज्ज्ञांची संख्या वाढली आहे. या प्रवाहात सामान्य वैद्यकीय पद्धती काहीशा मागे पडल्या. डॉक्टरांच्या मते, या नव्या उप-विशेषज्ञांच्या युगातही एक सर्वसामान्य, व्यक्ती-केंद्रित, सुलभ आणि व्यापक उपचार देणारा डॉक्टर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ‘फॅमिली मेडिसिन’ ही एक स्वतंत्र क्लिनिकल स्पेशॅलिटी म्हणून उदयास येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पायलटशिवाय 10 मिनिटे आकाशात उडत राहिले ‘Lufthansa’चे विमान, विमानात होते 200 प्रवासी; वाचा नंतर काय घडले?
कोविड-१९ महामारीच्या काळात फॅमिली डॉक्टरांनी दाखवलेले योगदान विसरता येणार नाही. चाचण्या, घरी विलगीकरण, औषधोपचार, संपर्क शोध, लसीकरण आणि मनोबल उंचावणे अशा अनेक स्तरांवर फॅमिली डॉक्टरांनी अहोरात्र सेवा बजावली. प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे हे श्वासरूप कार्यकर्ते म्हणून त्यांनी रुग्णालयांवरील ताण कमी केला आणि हजारो जणांना वेळेवर मदत पोहोचवली.
आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रावरील संशय व नकारात्मकतेच्या सावल्या पाहता, कुटुंब डॉक्टर ही संकल्पना पुन्हा बळकट करण्याची गरज आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील माणुसकीचा बंध, सातत्यपूर्ण संवाद आणि विश्र्वासाचे नाते हे कुटुंब उपचारपद्धतीचे आधारस्तंभ आहेत. यासाठी तरुण वैद्यकीय पदवीधरांनी फॅमिली मेडिसिनमध्ये करिअर करण्यासाठी पुढे यावे आणि या क्षेत्राची पत व प्रतिष्ठा नव्याने निर्माण करावी.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय भूमिगत बोगद्यात हलवले जाणार; भारताच्या कारवाईची भीती की युध्दाच्या सावटाची चाहूल?
“फॅमिली डॉक्टर” म्हणजे केवळ औषध देणारा व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेणारा साथीदार. जागतिक कुटुंब डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या सेवेचा सन्मान करावा आणि प्राथमिक आरोग्यसेवेला नवसंजीवनी देणाऱ्या या खऱ्या आरोग्यदूतांना मन:पूर्वक सलाम करावा.