World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार (फोटो सौजन्य: iStock)
जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रक्तदानाचे चित्र आश्वासक दिसत आहे. राज्यातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या ९ लाख ८८ हजार ८११ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य आता १० लाख रक्तदात्यांच्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.
World Eye Donation Day : अंधत्वावर आशेचा किरण! नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी १२ कोटींहून अधिक रक्तदान संकलित केले जाते. सुरक्षित आणि पुरेसा रक्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एखाद्या देशातील किमान १ ते २ टक्के लोकसंख्येने नियमित रक्तदान करणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे अनेक देशांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानले जाते.
भारतात रक्तसंकलन आणि उपलब्धतेसाठी केंद्र सरकारचे ‘ई-रक्तकोष’ हे राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ कार्यरत आहे. रक्तपेढ्या, रक्तदान शिबिरे आणि रक्तदात्यांची माहिती या प्रणालीद्वारे एकत्रित केली जाते. या पोर्टलवरील ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १ कोटी २ लाख ७९ हजार १६३ नोंदणीकृत रक्तदाते आहेत.
तर महाराष्ट्रातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या ९ लाख ८८ हजार ८११ वर पोहोचली असून २२ आगामी शिबिरे नियोजित आहेत. स्वैच्छिक रक्तदानाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
रक्तदानाबाबत पुणे जिल्ह्याचे योगदान विशेष ठरत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माहितीनुसार, २०२५ च्या जानेवारी ते मे या कालावधीत पुणे जिल्ह्यात २,१२७ रक्तदान शिबिरांमधून सुमारे १.५८ लाख युनिट रक्त संकलित झाले असून हा आकडा राज्यातील सर्वाधिक आहे.
दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. २००४-०५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिनाला अधिकृत मान्यता देण्यात आली. यंदाची थीम ही मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेवर आधारित आहे.
| रक्तदान | भारत | महाराष्ट्र |
|---|---|---|
| नोंदणीकृत रक्तदाते | १,०२,७९,१६३ | ९,८८,८११ |
| रक्तकेंद्रे | ४,५७२ | ४२८ |
| आयोजित शिबिरे | २,५६,६५३ | ३०,४६२ |
| आगामी शिबिरे | १,१६९ | २२ |
World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा






