World Eye Donation Day : अंधत्वावर आशेचा किरण! नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद (फोटो सौजन्य: एआय)
World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा
दरवर्षी १० जून रोजी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून ओळखला जातो. अंधत्वाविषयी जनजागृती वाढवणे आणि अधिकाधिक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.
देशात आणि राज्यात नेत्रदान चळवळीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना पुणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांत नेत्रबुबुळ (कॉर्निया) संकलनात सातत्य दिसून येत आहे. नेत्रदानातून मुख्यतः कॉर्नियाचा वापर प्रत्यारोपणासाठी केला जातो. कॉर्नियाच्या समस्येमुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची संधी मिळू शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानातून किमान दोन व्यक्तींना दृष्टी मिळण्याची शक्यता असते.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृश्यदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देशात नेत्रपेढ्या आणि कॉर्निया प्रत्यारोपण सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. देशभरात सध्या ३९६ नेत्रपेढ्या कार्यरत आहेत.
पुणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत जिल्ह्यात नेत्रबुबुळ संकलनात सातत्य दिसून आले आहे. विशेषतः २०२३–२४ या वर्षात सर्वाधिक १,२२६ नेत्रबुबुळ संकलनाची नोंद झाली असून ७७१ केरॅटोप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडल्या. यावरून जिल्ह्यात नेत्रदानाबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येते.
तज्ज्ञांच्या मते, नेत्रदानाबाबत अजूनही समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र चष्मा वापरणारे, मोतीबिंदू झालेले किंवा अनेक सामान्य आरोग्य स्थिती असलेले नागरिकही अनेकदा नेत्रदानासाठी पात्र असू शकतात. त्यामुळे अधिक जनजागृती आणि कुटुंबीयांमध्ये या विषयावर संवाद वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
| देशभरात कार्यरत नेत्रपेढ्या | ३९६ |
|---|---|
| २०२२–२३ | ६२,३७० कॉर्निया संकलन |
| २०२३–२४ | ६६,४३४ कॉर्निया संकलन |
| २०२४-२५ | ६९,८४८ कॉर्निया संकलन |
| वर्ष | लक्ष्य | संकलन | लक्ष्यपूर्ती | शस्त्रक्रिया |
|---|---|---|---|---|
| २०२१-२२ | १,३०० | ९३६ | ६६.९% | ६६९ |
| २०२२-२३ | १,३०० | ९६२ | ६४.२% | ६४२ |
| २०२३-२४ | १,०४० | १,२२६ | ७७.१% | ७७१ |
| २०२४-२५ | १,१८८ | १,१७० | ७०.४% | ७०४ |
| २०२५-२६ | १,१८८ | १,०९६ | ६८.४% | ६८४ |
(२०२३–२४ मध्ये सर्वाधिक नेत्रबुबुळ संकलनाची नोंद)






