World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा (फोटो सौजन्य: एआय)
महासागर हे पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णतेचा मोठा भाग शोषून घेतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचाही मोठा हिस्सा सामावून घेतात. त्यामुळे शहरांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा परिणाम महासागरांच्या तापमानावर, पाण्याच्या रसायनशास्त्रावर आणि पुढे पर्जन्यमानाच्या स्वरूपावर होतो.
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवाल २०२४- २५ कडे पाहिले असता वाढत्या शहरी दबावाचे चित्र समोर येते. या अहवालानुसार शहरातील एकूण वीज वापर वाढला असून निवासी क्षेत्राचा त्यात मोठा वाटा आहे. वाहनसंख्येतही वाढ झाली आहे. सकारात्मक बाब म्हणजे सौरऊर्जा क्षमतेत वाढ आणि एलईडी वापरातून ऊर्जा बचत झाली आहे; मात्र एकूण पर्यावरणीय दबाव अजूनही वाढत असल्याचे दिसून आले.
पण समुद्राशी या सगळ्याशी कुठे संबंध येतो? तर नदी आणि कार्बन असा हा संबंध आहे. पुणे शहरातून दररोज सुमारे ९८० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. उपलब्ध माहितीनुसार त्यातील सुमारे ६४ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते, म्हणजे उर्वरित भाग आणि व्यवस्थेतील तफावत ही नदी परिसंस्थेवर दबाव निर्माण करते. शहरातील सांडपाणी व्यवस्था, उपचार क्षमता आणि प्रत्यक्ष प्रक्रिया यातील अंतरावर अलीकडेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मुळा–मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त प्रक्रिया क्षमता उभारण्याचे काम सुरू असून शहरातील सांडपाणी व्यवस्थेवर अजून मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, शहरात तयार होणारा कचरा, सांडपाणी, वाहनांचा वापर आणि ऊर्जा वापर हे चार घटक एकत्रितपणे महासागरांवर अप्रत्यक्ष परिणाम करतात. त्यात भर म्हणजे कचरा व्यवस्थापनावरील ताण. महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये कचरा निर्मिती आणि प्रक्रिया क्षमतेत अजूनही तफावत असल्याचे अलीकडील अहवालांनी अधोरेखित केले आहे.
पुण्यातील ऊर्जा वापर → कार्बन उत्सर्जन → वातावरण गरम होणे → महासागर अतिरिक्त उष्णता शोषणे → हवामान बदल → मान्सून आणि शहरांवर परिणाम
पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा. डॉ. अनिल राऊत सांगतात ‘समुद्र संवर्धन म्हणजे फक्त किनाऱ्यावरची स्वच्छता मोहीम नाही; ती शहराच्या रोजच्या सवयींमध्ये दडलेली आहे. पुण्यासारख्या शहरांसाठी त्याचा अर्थ हा कमी ऊर्जा वापर, सार्वजनिक वाहतूक, सांडपाणी प्रक्रिया वाढवणे, कचरा वर्गीकरण आणि नदी परिसंस्था जपणे असा आहे. त्यामुळे समुद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. कारण हा प्रश्न आता केवळ किनाऱ्यापुरता नसून तो शहरांच्या जीवनशैलीतून आकार घेत आहे.’
दरवर्षी ८ जूनला विश्व सागरी दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २००८ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली होती. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यंदाचा विश्व सागरी दिवस हा महासागराकडे नव्या नात्याने पाहूया या संकल्पनेवर आधारित आहे.






