 
        
        बेन ऑस्टिन आणि फिल ह्युजेस(फोटो-सोशल मिडिया)
Australian cricketer dies after being hit by ball : क्रिकेट जगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सराव सत्रादरम्यान मानेला चेंडू लागल्याने १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. बेन ऑस्टिन असे मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव आहे. बेनच्या मृत्यूने २०१४ मध्ये फिल ह्यूजेसच्या मृत्यूच्या दुःखद आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मंगळवारी मेलबर्नच्या आऊटर ईस्टमधील फर्न्ट्री गली येथे सराव सत्रादरम्यान बेनजखमी झाला होता. तो टी२० सामन्याची तयारी करत असताना त्याच्या मानेवर साइडआर्मचा चेंडू लागला. त्यावेळी ऑस्टिनने हेल्मेट घातले होते, परंतु त्यात स्टीम गार्ड नव्हते. या दुखपतीत त्याचा बुधवारी मृत्यू झाला आहे.
ऑस्टिनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. फर्नी गली येथे सराव दरम्यान त्याच्या मानेला आणि डोक्याला चेंडू लागला. तो टी२० सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करत होता. अपघातानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु त्याला वाचवता आले नाही. फर्नी गली क्रिकेट क्लबने गुरुवारी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. बेनच्या मृत्यूमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. त्याच्या कुटुंबाला, मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना आमची संवेदना, क्लबने म्हटले आहे.
सराव दरम्यान त्याने हेल्मेट घातले होते पण नेकगार्ड नव्हता. या अपघातामुळे पुन्हा एकदा सर्व स्तरांवर खेळांमध्ये सुरक्षा उपकरणांचा वापर करण्याची मागणी झाली आहे. यापूर्वी, क्रिकेट व्हिक्टोरियाने बेनचे वडील जेस ऑस्टिन यांच्या हवाल्याने कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, आमच्या लाडक्या बेनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे.
हेही वाचा : IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…
बेन हा ट्रेसी आणि माझा लाडका मुलगा होता आणि कूपर आणि जॅशचा खूप लाडका भाऊ होता. तो आमच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या जीवनाचा प्रकाश होता. या दुर्घटनेने तो आमच्यापासून दूर नेला. त्याला क्रिकेटची आवड होती आणि खेळ हा त्याच्या आयुष्यातील आनंद होता. असेही म्हटले आहे की, त्या वेळी नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या अपघातामुळे दोन तरुणांवर परिणाम झाला आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. बेन नेहमीच लक्षात राहील. नोव्हेंबर २०१४ मध्ये, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचा सिडनी येथे प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना कानाजवळ बाउन्सर आदळल्याने मृत्यू झाला.






