मुंबई : कतार येथे संपन्न झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेततील अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवून विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. तर २०१८ फुटबॉल विश्वचषकाचा विजेता ठरलेल्या फ्रान्स संघाला पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यापासून रोखले. अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये गमावलेला सामना फ्रान्स संघाच्या जिव्हारी लागला आहे. अशातच फ्रान्सच्या एका स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
स्टार फुटबॉलर करीम बेन्झिमा (Karim Benzema) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन बेन्झिमाने ही माहिती एक भावनिक संदेश लिहित दिली असून सोबत फ्रान्सच्या जर्सीतील एक फोटोही पोस्ट केला आहे. यंदाच्या विश्वचषकात दुखापतीमुळे तो संघाचा भाग नव्हता आणि आता फ्रान्सनं विश्वचषक गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेन्झिमानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे.
J’ai fait les efforts et les erreurs qu’il fallait pour être là où je suis aujourd’hui et j’en suis fier !
J’ai écrit mon histoire et la nôtre prend fin. #Nueve pic.twitter.com/7LYEzbpHEs— Karim Benzema (@Benzema) December 19, 2022
बेन्झिमाने त्यांची मातृभाषा फ्रेन्चमध्ये पोस्ट लिहित निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने लिहिलं आहे, ‘आज मी जिथं आहे, तिथे पोहचण्यासाठी मी प्रयत्न केले, माझ्याकडून चूकाही झाल्या आणि मला या सर्वाचा अभिमान आहे! मी माझी कथा लिहिली आहे आणि आता ती कथा संपत आहे.’
फुटबॉल या जगप्रसिद्ध खेळातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजे ‘बलॉन डी’ओर (Ballon d’Or Award). तो यंदा करीम बेन्झिमा (Karim Benzema) यानेच मिळवला होता. वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जाणारा हा प्रतिष्ठीत पुरस्कार बेन्झिमाने जिंकत इतिहास रचला. 30 टॉप खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बेन्झिमाने बाजी मारली. त्यानं चॅम्पियन्स लीगमध्ये कमाल कामगिरी केली. 46 सामन्यात त्यानं 44 गोल केले होते. विशेष म्हणजे फ्रान्सचा जादूगार फुटबॉ़लर जिदाने याने 1998 मध्ये बलॉन डी’ओर पुरस्कार मिळवला होता, ज्यानंतर थेट 24 वर्षांनी बेन्झिमाने हा मान मिळवला. पण आता हा फ्रान्सचा स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. असं असलं तरी प्रसिद्ध क्लब रिअल माद्रीदकडून तो नक्कीच मैदानात उतरेल.