झुबीन गर्ग(फोटो- सोशल मीडिया)
Women’s World Cup Opening Ceremony : २०२५ महिला विश्वचषकचा थरार ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या समारंभात आसामी सांस्कृतिक आयकॉन झुबीन गर्ग यांना विशेष संगीतमय श्रद्धांजली सादर करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘Boycott’ चा आवाज ओसरला! विजेतेपदाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी उडाली धावपळ
आसाम क्रिकेट असोसिएशनकडून या सामन्यासाठी आणि उद्घाटन समारंभासाठी ५,००० मोफत तिकिटे वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे की, अंगाराग पापोन महंता आणि जोई बरुआ यांच्यासह राज्यातील प्रमुख कलाकार शिलाँग चेंबर कॉयरसह संगीतमय श्रद्धांजली सादर करणार आहेत. त्यांनी सांगितले की उद्घाटन समारंभात हा ४० मिनिटांचा विशेष कार्यक्रम असणार आहे.
५,००० टिकीटांचे मोफत वाटप
३० सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना होणार आहे. या सामन्यासाठी एसीएकडून गर्गच्या चाहत्यांना ५,००० मोफत तिकिटे वाटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटी स्पोर्ट्स असोसिएशन (जीएसए) सोमवारी एसीएच्या वतीने मोफत तिकिटे वाटली जाणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुवाहाटीतील नेहरू स्टेडियममधील जीएसए कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून तिकिटे उपलब्ध करण्यात येणार आहेत.
१९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात बुडून गर्ग (५२) यांचे निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोकाकुल वातावरण आहे. गर्ग खेळांबद्दल, विशेषतः फुटबॉलबद्दल प्रेमासाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मैत्रीपूर्ण फुटबॉल आणि क्रिकेट सामन्यांमध्ये भाग नोंदवला होता.
भारत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध एक मोठा सामना होणार आहे.
९ ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी भारत पुन्हा ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे. तर २३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल. भारताचा शेवटचा लीग सामना २६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात येणार आहे.