हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीच्या वेळी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की हार्दिकला दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पंड्या सराव दरम्यान मैदानावर सराव करताना दिसला नाही.
हार्दिक पंड्या जर आशिया कपच्या फायनलमध्ये खेळला असता, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक अनोखी कामगिरी करू शकला असता. आतापर्यंत बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी फक्त या दोन खेळाडूंनी टी-२० मध्ये १५०० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
हार्दिक पंड्या या यादीतील तिसरा खेळाडू बनण्याची संधी होती. कारण त्याच्याकडे आधीच १८६० धावा आणि ९८ विकेट्स जमा आहेत. त्याला फक्त दोन विकेट्सची आवश्यकता होती, परंतु अंतिम सामन्यात तो खेळू शकणार नाही त्यामुळे हार्दिक पंड्याला ही कामगिरी करण्यासाठी आणखी काही काळ वाट बघवी लागणार आहे.
भारतीय संघाकडून अंतिम सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या या सामन्याचा भाग असणार नाहीत. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज अष्टपैलू शिवम दुबे आणि फलंदाज रिंकू सिंग यांचा संघात समावेश केला गेला आहे. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यासाठी विश्रांती दिली गेली होती. तर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे अंतिम संन्यातून बाहेर पडला आहे.






