दिव्या देशमुखने पटकावले विजेतेपद
मुंबई: महाराष्ट्राची १९ वर्षीय लेक दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकार सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिव्याने या लढतीत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत ६४ घरांची राणी बनण्याचा मान पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FIDE विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यामुळे दिव्या देशमुखचे अभिनंदन केले आहे. फडणवीस यांनी फोनवरून दिव्या देशमुखचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. ‘हा क्षण आणि नागपूरसाठी आणि आपल्या राज्यासाठी गर्वाचा आहे. महाराष्ट्र सरकार १९ वर्षीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा सत्कार करेल’, असे फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे. महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँडमास्टर ठरल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधीत्व करत, ३५ वेळा पदक पटकाविले आहे. यात तब्बल २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ ब्राँन्झ पदकांचा समावेश आहे. बुद्धिबळाच्या विश्वविजेते पदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली, हे देखील विशेष मानावे लागेल.
आजच्या दिवसाचा सारांश । सोमवार, 28 जुलै 2025
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..!
विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनhttps://t.co/H6JHHnQHmjदिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 28, 2025
बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्वाचीच अशी आहे. दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली या तोडीस तोड होत्या. या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँण्डमास्टर बुद्धिबळपटू मिळाली आहे. तीही महाराष्ट्रातून हे विशेष. या दोघींचे यश हे भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार आहे. हे यश भारताच्या क्रीडा लौकीकात भर घालणारे आहे. या यशासाठी दिव्या आणि कोनेरु यांचे मनापासून अभिनंदन.
ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांची विश्वविजेती कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी असा क्षण आहे. या विश्वविजयी कामगिरीसाठी ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी मेहनत घेणाऱे प्रशिक्षक – मार्गदर्शक तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचे मनापासून अभिनंदन..ग्रँण्डमास्टर दिव्या यांच्याकडून यापुढे कॅँण्डिडेटस् स्पर्धेतही असाच विजय साकारला जाईल असा विश्वास आहे. त्याकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
महाराष्ट्राच्या १९ वर्षीय कन्या दिव्या देशमुखने जगात भारताची मान उंचावली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे. दोन उत्कृष्ट भारतीय खेळाडूंच्या सहभागाने हा एक ऐतिहासिक अंतिम सामना होता. मोदींनी ‘एक्स’ वर लिहिले की “दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना. २०२५ मध्ये FIDE महिला जागतिक बुद्धिबळ विजेता बनलेल्या तरुणी दिव्या देशमुखचा अभिमान आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. हे अनेक तरुणींना प्रेरणा देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.