फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील लढतीचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. या प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे वादग्रसत पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले, की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली होती. यात राक्षे हा चीतपट झाल्याचा पंच नितेश काबिले यांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाला विरोध करताना मल्ल राक्षेने नंतर पंचांना मारहाण केली होती.
यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कुस्ती चीतपट झाली की नाही, या पंचांच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी राज्य कुस्तीगीर संघाने विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पंच काबिले यांच्यावर तीन वर्षे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकशी समितीच्या अहवालात काबिले यांनी मुख्य पंच आणि सहाय्यक पंच यांच्याकडे निर्णयाची मागणी केली होती. मात्र, मुख्य पंचांनी क्षण नीट दिसत नसल्याचे सांगून दुसऱ्या पंचाकडे निर्णय मागण्यास सांगितले. अर्थात, मॅटवरील गर्दीमुळे दुसऱ्या पंचालाही तो क्षण नीट दिसत नव्हता आणि तो मॅटवर जाऊनही पाहू शकत नव्हता. त्यामुळे सकृत दर्शनी जे समोर आले ते पाहून सर्व पंचांनी चीतपटीच्या निर्णयास संमती दिली. मात्र, तो क्षण कुस्ती चीतपट मागण्याचा नव्हताच, काबिले यांनी चीतपट कुस्तीची विचारणा करणे चुकीचे होते या कारणासाठी त्यांना दोषी धरण्यात आल्याचे भोंडवे यांनी सांगितले.
भोंडवे म्हणाले की, स्पर्धेने आम्हाला ठेच लागली आहे. त्यातून धडा घेऊन आम्ही यापुढे मॅट मोकळे असेल, तरच लढत खेळविली जाईल, अशा पद्धतीचा आयोजकांशी करार करणार आहोत. अंतिम लढतीदरम्यान पंचांच्या आसपासच्या भागात कुणाचीही उपस्थिती राहणार नाही. अशी काळजी घेण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे.
महेंद्र गायकवाडवरील बंदी मागे या स्पर्धेच्या किताबाच्या लढतीत पंचांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन महेंद्र गायकवाड कुस्ती सोडून निघून गेला होता. तसेच त्याने पंचांबाबत अपशब्दही काढले होते. त्यामुळे त्याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, महेंद्रने नंतर झाला प्रकार माझ्याकडून गैरसमजुतीने झाला होता असे सांगून माफी मागितल्यामुळे त्याच्यावरील बंदी मागे घेण्याचाही निर्णय राज्य कुस्तीगीर महासंघाने घेतला.