निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; अनेकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील घणसोली विभागातील प्रथम नगरसेवक व सभापती दिवंगत दीपक दगडू पाटील यांच्या पत्नी व नगरसेविका शोभा दीपक पाटील तसेच त्यांचे पुत्र व नवी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाणे महापालिकेच्या माजी महापौर स्मिता इंदुलकर, त्यांचे पती व ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष इंदुलकर आणि त्यांचे पुत्र युवासेनेचे निशांत सुभाष इंदुलकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. त्यांचा आजवरचा राजकीय अनुभव पक्षासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दरम्यान, शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन सेना महायुतीचे मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक ९३ चे उमेदवार सुमित वजाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच ! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?
दरम्यान, पुण्यातही अशाच स्वरुपाची परिस्थिती आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या बैठकाही सुरु आहे. अनेक कार्यकर्ते उमेदवार यादीची वाट पाहत आहे. लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर होणार आहे. पक्षप्रवेशाचे कार्यक्रमही पार पडत आहेत. पुणे शहर भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच आहे. माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांनी हातात कमळ घेतले आहे.
भाजपचा राष्ट्रवादीला धक्का
भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. एकीकडे उमेदवारी अंतिम करीत असतानाच हे प्रवेश करून घेतले जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, निवडणुक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत शनिवारी हे पक्षप्रवेश पार पडले.






