मैदानी कुस्तीमध्ये ‘बकुट’ कसाटा डावामुळे वादंग निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
औंध : फिरोज मुलाणी : मैदानी कुस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बकुट’ (कसाटा) डावामुळे वादंग निर्माण झाला आहे. मूळतः प्रतिस्पर्ध्याचा तोल बिघडवण्यासाठी आणि नियंत्रणासाठी वापरला जाणारा हा डाव केला जातो.अलिकडे कानाजवळ जोरात केलेल्या चुकीच्या प्रहारामुळे पैलवान मैदानात हातघाईवर येण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. कुस्ती क्षेत्रात बकुट डावाबद्दल नियम स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. (Satara News)
मैदानी पारंपरिक कुस्तीमध्ये अनेक जुने आणि प्रभावी डाव आजही वापरले जातात. त्यापैकी ‘बकुट’ (कसोटा) हा एक डाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही जणांच्या मते हा अत्यंत तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण डाव आहे, तर काहींच्या मते तो खेळाडूंसाठी धोकादायक प्रहार ठरू शकतो.
अलीकडे काही कुस्ती मैदानात खेळाडूंनी कानाजवळ जोरात हात मारणे सुरू केले “झटका” ऐवजी “थप्पड/प्रहार” केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना इजा होण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. डावाच्या चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याने कुस्तीच्या मैदानात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
हे देखील वाचा : सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर? जिल्हा परिषद ‘अपहरण नाट्या’चे पडसाद
अगदी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत देखील याचा प्रत्यय आला आहे. अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यातील लढतीत महेंद्रचा संयम सुटल्यामुळे त्याने जोरदार समोरुन प्रहार केला (याला कसाटा म्हणता येणार नाही.) यावर हर्षवर्धन याने चपळाईने त्याचा डाव हाणून पाडला मात्र पंचाकडे याबाबत उद्विग्नता व्यक्त केली होती. मागे सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे यांच्या मैदानी कुस्तीत बकुट मारण्यावरुन वादाचा मोठा गदारोळ उठला होता.
नवीन मल्लांना हा डाव अचूक कसा करायचा याचे अद्यावत ज्ञान नसल्याने कुस्ती मैदानात डावाचा चुकीचा वापर केला जात आहे. यामुळे खेळाडूंना चक्कर येणे, किरकोळ दुखापत आणि कुस्ती थांबवावी लागणे अशा घटना समोर आल्या आहेत.
बकुट’ हा डाव कुस्तीच्या परंपरेचा भाग असला, तरी त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचार करण्याची गरज आहे. परंपरा आणि आधुनिक सुरक्षितता यांचा समतोल साधत, योग्य प्रशिक्षण आणि नियमांच्या माध्यमातून हा वाद सोडवणे आवश्यक असल्याचे हिंदकेसरी विकास जाधव यांनी सांगितले. डॉक्टरांच्या मते, अशा डावांमध्ये मान आणि मणक्यांवर ताण येतो.“जर चुकीच्या पद्धतीने कानावर,मानेवर जोरदार प्रहार केला तर दीर्घकालीन दुखापती होतात.त्यामुळे योग्य सुरक्षा उपाय आवश्यक आहेत,” असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : SIT चौकशीलाच चाकणकरांची दांडी; कारण दिलं ‘प्रवास करण्यास असमर्थ…’
कसा करतात बकुट डाव?
पारंपरिक कुस्तीमध्ये “बकुट” हा प्रतिस्पर्ध्याचा तोल बिघडवण्यासाठी वापरला जाणारा डाव आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मान, आणि खांदा यामधील भागावर प्रहार करून त्याचे लक्ष विचलित होताच नियंत्रण मिळवून त्याला पटकन खाली आणण्यासाठी वापरला जातो. अनुभवी मल्लांच्या मते, हा डाव योग्य तंत्र आणि संतुलनाने केला तर अत्यंत प्रभावी ठरतो. मात्र, नवख्या खेळाडूंनी तो चुकीच्या पद्धतीने वापरल्यास दुखापतीची शक्यता वाढते.
मैदानी कुस्तीतील हा हिडीस प्रकार थांबला पाहिजे.
छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डुवाडीचे वस्ताद कुस्तीसम्राट अस्लम काझी म्हणाले की, “मान आणि खांदा याच्या मध्ये पोकळ हाताने ठोका मारुन पैलवाचे लक्ष्य विचलित करणे याला कुस्तीच्या भाषेत कसोटा किंवा बकोट म्हणतात. मुळात मैदानी कुस्तीतील हा प्रकार असला तरी ठोका योग्य पध्दतीने मारण्याची कला आहे. अलीकडे नवोदित मल्लामध्ये सहनशीलतेचा अभाव दिसून येत आहे. मल्ल मैदानात डावाचा चुकीचा वापर करीत आहेत.यामुळे वाद निर्माण होतात.वस्तादांनी अचूक मार्गदर्शन केले पाहिजे.मुळात गादीवर हा डाव करताच येत नाही. मैदानी कुस्तीत देखील असले हिडीस प्रकार थांबले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा डाव चालत नाही.
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड म्हणाले की, “मानेवर पोकळ हाताने प्रहार करणे चुकीचे असून याला नकारात्मक कुस्ती म्हणतात.गादीवरील कुस्तीमध्ये एखाद्या मल्लाने जाणीवपूर्वक प्रतिस्पर्धी गोंधळून जावा यासाठी (कसाटा) बकुट मारला तर पंच डाव करणाऱ्या मल्लाला प्रथम समज देतात.पुन्हा असा प्रकार घडला तर प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो.आंतरराष्ट्रीय स्तरावर हा डाव करण्यास प्रतिबंध आहे.” अशी माहिती गुंड यांनी दिली.






