(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
सॅम करनच्या जागी श्रीलंकेचा दासुन शनाका २ कोटी रुपयांच्या करारासह राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, शनाकाने पाकिस्तान सुपर लीगमधील आपला करार मोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पीएसएलमध्ये त्याला लाहौर कलंदर्सने ७५ लाख पाकिस्तानी रुपयांत घेतले होते, पण आयपीएलच्या ऑफरनंतर त्याने पाकिस्तानला ‘बाय-बाय’ केले आहे. सध्या पाकिस्तानच्या लीगमध्ये ही काही अलबेल नाही त्यामुळे त्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सॅम करन २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) भाग होता. एका मोठ्या ‘ट्रेड’ अंतर्गत सॅम करन आणि रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये आले होते, तर त्यांच्या बदल्यात राजस्थानने आपला कर्णधार संजू सॅमसनला चेन्नईला दिले होते. मात्र, आता दुखापतीमुळे राजस्थानला करनची उणीव भासणार आहे.
From the shores of Lanka to Rajasthan, this all-rounder is now ouRRs! 💗🔥 Padhaaro mhare des, Dasun Shanaka 🇱🇰 pic.twitter.com/OY1iPsMHjZ — Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 23, 2026
राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या बदलावर भाष्य केले. तो म्हणाले, “सीजन सुरू होण्यापूर्वी सॅमसारखा महत्त्वाचा खेळाडू गमावणे निराशाजनक आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आमचा कणा होता. तरीही, दासुन शनाकासारखा अनुभवी खेळाडू संघात आल्याने आम्हाला आनंद आहे. तो एक उत्तम फिनिशर आणि अष्टपैलू खेळाडू असून संघाचा समतोल राखण्यास मदत करेल.”
दासुन शनाक हा श्रीलंकेचा तगडा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. शनाका यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. टी-२० कारकीर्द ही त्याने गाजवली आहे. श्रीलंकेसाठी १३१ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १,९१२ धावा केल्या आहेत, ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी खतरनाक राहिली आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी विशेष ओळखला जातो. फलंदाजीसोबतच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४६ बळीही घेतले आहेत. सॅम करन बाहेर गेल्यामुळे राजस्थानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, पण दासुन शनाकाच्या समावेशामुळे राजस्थानची मधली फळी आता अधिक मजबूत झाली आहे.






