दिव्या देशमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(फोटो-सोशल मीडिया)
Divya Deshmukh congratulated by Prime Minister Modi : १९ जून रोजी सोशल मीडियावर दिव्या देशमुख खूप चर्चेत आली. यामागील कारण म्हणजे या महाराष्ट्राच्या लेकीने जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत चीनची दिग्गज खेळाडू हौ यिफानला पराभूत केले आहे. भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जागतिक ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत तिने चीनची नंबर वन खेळाडू हौ यिफानला चारीमुंड्या चित केले आहे.
चीनच्या खेळाडूने उपांत्य फेरीत तिला पराभूत केले असले तरी, दुसऱ्या सामन्यात १९ वर्षीय दिव्याने शानदार पुनरागमन करून दाखवले आहे. या दरम्यान, पांढऱ्या तुकड्यांसह खेळत तिने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी खेळाडूवर आपला दबदबा कायम ठेवला. त्याच वेळी, तरुण भारतीय खेळाडूने ब्लिट्झ बुद्धिबळात वेळेचे योग्य व्यवस्थापन केले, याचमुळे ती चिनी दिग्गज खेळाडूला हरवण्यात यशस्वी ठरली.
दिव्याच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आनंद व्यक्त केला. त्यांनी दिव्याला तिच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, “लंडनमधील ब्लिट्झ वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमांक १ हौ यिफानला हरवल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. तिचे यश तिचे धाडस आणि दृढनिश्चय दर्शवते. हे अनेक येणाऱ्या बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देते. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.” असे मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs ENG: पहिल्या कसोटी पूर्वी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण; ‘या’ दोन दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो..
दिव्या देशमुख ही १९ वर्षांची प्रतिभावान बुद्धिबळपटू असून तिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. तिचे पालक व्यवसायाने डॉक्टर आहेत. तिच्या आईचे नाव नम्रता आणि वडिलांचे नाव जितेंद्र आहे. भारताची स्टार बुद्धिबळपटू दिव्याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ हा खेळ खेळायला सुरुवात केली. तिने २०१२ मध्ये अंडर-७ राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले होते. त्यावेळी ती केवळ सात वर्षांची होती. यानंतर, तीने मागे वळून पाहिले नाही. तीने अंडर-१० डर्बन-२०१४, अंडर-१२ ब्राझील प्रकारात जागतिक युवा विजेतेपद देखील जिंकले आहे.