सईद अन्वर आणि सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
Double Century In One Day Cricket : सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वात ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावे क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात अनेक विक्रमांची नोंद आहे. क्रिकेट जगतात त्याचे स्थान एखाद्या धुरव ताऱ्यासारखे अढळ आहे. सचिन तेंडुलकरने 2010 साली ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठोकून क्रिकेट जगाला आश्चर्याचा सुखद धक्का दिलो होता. तेंडुलकरच्या आधी अनेक फलंदाज 200 च्या जवळपास पोहचले होते. पण त्यातील एकाला देखील हा आकडा पार करण्यात यश आले नाही. 1997 साली मात्र एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक ठोकण्याचा मान एका पाकिस्तानी फलंदाजाला मिळणार होता, परंतु सचिन तेंडुलकरने त्याच्या वाट्याचा हा मान हिसकावून घेतला आणि त्याचे स्वप्न भंग पावले.
पाकिस्तानचा माजी सलामीवीर सईद अन्वरने 1997 मध्ये चेन्नई येथे भारताविरुद्ध 194 धावा चोपल्या होत्या. ती धावसंख्या त्यावेळची एकदिवसीय खेळातील सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर 2009 मध्ये झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीने 194 धावांची नाबाद खेळी खेळून या विक्रमाशी बरोबरी साधली होती, मात्र त्यानंतर अवघ्या वर्षभरातच सचिन तेंडुलकरने नाबाद 200 धावांची ऐतिहासिक खेळी साकारून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.
हेही वाचा : CSK VS RR : ‘कॅप्टन कुल’कडून पाय मोडलेल्या ‘द वॉल’ची विचारपूस, तर नितीश राणानेही केली द्रविडसाठी खास कृती..
चेन्नई येथे 1997 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात सईद अन्वर 194 धावांवर खेळत होता. त्यावेळी अन्वर सौरव गांगुलीच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरच्या हाती झेल देऊन बाद झाला आणि त्याचे द्विशतकाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. उल्लेखनीय म्हणजे या घटनेच्या 13 वर्षांनंतर सईद अन्वरला वनडेत द्विशतक झळकावण्यापासून वंचित ठेवणाऱ्या सचिन तेंडुलकरनेच वनडेत पहिल्यांदाच द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम केला होता.
सचिन तेंडुलकरनंतर वीरेंद्र सेहवागने 2011 मध्ये 219 धावांची खेळी करून सचिनच्या विक्रमाला मोडीत काढले होते. त्यानंतर रोहित शर्माने 2013 मध्ये 209 धावा केल्या होत्या. तसेच पुढच्याच म्हणजे 2014 मध्ये पुन्हा रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 264 धावांची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम होता. यानंतर 2015 च्या विश्वचषकात ख्रिस गेलने 215 धावा केल्या होत्या, तर मार्टिन गप्टिलने 237 धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांतर पुन्हा एकदा 2017 मध्ये, रोहित शर्माने 208 धावा करत तिसरे द्विशतक झळकावले होते. यानंतर 2018 मध्ये पाकिस्तानी फलंदाज फखर जमानने 210 धावांची खेळी केली होती.
हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video
सईद अन्वर 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला (1990-2003) आहे. 2001 ची मुलतान कसोटी ही सईद अन्वर या पाकिस्तानी फलंदाजासाठी शेवटची कसोटी राहिली. या कसोटीत शतक झळकावल्यानंतर तो पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना दिसून आला नाही. तीच त्याची शेवटची कसोटी ठरली होती. सईद अन्वर 1990 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते.